टोमॅटोबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्य सरकारला दिले हे आदेश
शेती

टोमॅटोबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्य सरकारला दिले हे आदेश

नवी दिल्ली : देशात टोमॅटोचे भाव पडल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एमआयएस योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत, अशी सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पियुष गोयल आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याशी याबाबत चर्चा केली. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या टोमॅटोच्या प्रश्नावरून आक्रमक झाले असताना भारती पवार यांनी केंद्रातील संबंधित मंत्र्यांशी संपर्क साधत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न चालवला होता.

या व्यवहारात राज्य सरकारला जो तोटा सहन करावा लागेल, त्यातील 50 टक्के वाटा केंद्र सरकारकडून राज्याला देण्यात येईल, अशी माहिती भारती पवार यांनी दिली आहे. राज्य सरकारने केंद्राला याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याची विनंतीदेखील त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे टोमॅटोची निर्यात सुरूच असून ती बंद केलेली नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, यावर्षी महाराष्ट्रात टोमॅटोचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं आहे. पुरवठा वाढल्यामुळे मागणी घटली आहे आणि टोमॅटोचे भाव उतरले आहेत. काही ठिकाणी तर 2 ते 3 रुपये किलो दराने शेतकऱ्यांना बाजार समितीत टोमॅटो विकावे लागत आहेत. या दरामुळे उत्पादनाचा खर्चदेखील निघत नसल्यामुळे शेतकरी आपला माल रस्त्यावर फेकून देत असल्याचं चित्र महाराष्ट्रात काही ठिकाणी दिसत आहे.