शेती

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली

नाशिक : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक निर्णय घेतला असून कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे. केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यासह देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारच्या आदेशानुसार येत्या एक जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कांदा उत्पादकांना केंद्राच्या या निर्णयाने नववर्षाच्या सुरुवातीस सुखद धक्का दिला आहे. केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत विदेश व्यापार संचलनालयाने सूचना काढून कांद्याच्या निर्यातबंदी धोरणात बदल केला. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीपासून पुन्हा नाशिकसह देशातील कांदा विदेशात जाण्यासाठी सज्ज होणार आहे.

दिवाळी अगोदरच्या कालावधीत कांद्याचे आवाक्याबाहेर जाणारे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यातबंदीच्या पाठोपाठ कांदा व्यापाऱ्यांवरदेखील निर्बंध घातले होते. १४ सप्टेंबर रोजी केंद्राने कांदा निर्यातबंदी केली होती. त्या पाठोपाठच ऑक्टोबरमध्ये व्यापारी व किरकोळ व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. तसेच जिल्ह्यातील व्यापाऱ्यावर छापेही टाकले होते.

कांदा उत्पादकांच्या विविध संघटना, राजकीय संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. कांदा निर्यातबंदी व दिवाळीनंतर बाजार समित्यांमध्ये वाढलेली आवक यामुळे कांद्याचे भावदेखील मोठ्या प्रमाणावर पडल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर तीन महिन्यांनी केंद्राने निर्यातबंदी उठवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *