राजा राम मोहन रॉय : आधुनिक शिक्षणाचा जन्मदाता
ब्लॉग

राजा राम मोहन रॉय : आधुनिक शिक्षणाचा जन्मदाता

ब्रिटिश कंपनीची सत्ता भारतात मूळ धरत असतानाच्या काळात भारतीय समाजाला आधुनिकतेच्या वाटेवर घेऊन जाण्याचा ध्यान घेतलेले धर्म व समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांचा आज जन्मदिन! हिंदु समाजाला मिळणाऱ्या शिक्षणाला वेद पाठशाळांतून बाहेर काढून आधुनिक शाळांमध्ये पोहोचविण्याचे कार्य राम मोहन यांनी केले. या मूलभूत सुधारणेची फळे आपण आजही चाखत आहोत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी गावात १७७२ मध्ये आजच्या दिवशी राम मोहन यांचा एका समृद्ध व प्रसिद्ध कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडिल कृष्णचंद्र तिथल्या नबाबाच्या दरबारात होते. त्यामुळे त्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळाले. भारतीयांची बुरसटलेली विचारसरणी व पराभूत लाचार मनोवृत्ती पाहून ते व्यथीत होत. त्यावर हल्ला करण्यासाठी त्यांनी हिंदु धर्मशास्त्राचा अभ्यास केली व ते बायबलही शिकले. त्यामुळेच ते एकाच वेळी हिंदु धर्ममार्तंड व खिस्ती धर्मप्रसारक यांच्याशी वाद घालत.

हिंदूंमधील सतीची चाल बंद करण्यासाठी त्यांनी जनजागृतीचे कार्य हाती घेतले. त्यासाठी त्यांना परंपरावाद्यांविरूद्ध संघर्ष करावा लागला. १८१८ साली, सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून समाजातील प्रतिष्ठित मंडळीच्या सह्यांसह एक अर्ज त्यांनी सरकारकडे पाठवला. त्यात म्हटले, की या अमानुष चालीवर बंदी घालून सरकारने कायदा करावा आणि हे समाजाकडून व आप्तेष्टांकडून होणारे स्त्रियांचे खून बंद पाडावेत. त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राममोहनांशी प्रदीर्घ चर्चा करून सतीबंदीच्या कायद्याची निश्चिती केली. ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीबंदीचा कायदा जाहीर केला.

एव्हाना राम मोहन राधानगरी सोडून कलकत्त्यात स्थायिक झाले होते. लॅार्ड बेंटिंक यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध निर्माण करून त्यांनी भारतीयांसाठी आधुनिक शिक्षणाचा पाया रचला. भारतात शाळा सुरू झाल्या व विद्यार्थी भाषा, गणित, विज्ञान या विषयांचे क्रमिक शिक्षण घेऊ लागले. भारतीय समाजातील धर्मविषयक कल्पनांवर चर्चा होऊन सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी ब्रह्म समाज (ब्राह्मो समाज) स्थापन केला. त्या काळात ब्रिटिश कंपनी सरकारच्या आश्रयाने ख्रिस्ती धर्मगुरू उद्दाम झाले होते. त्यांच्याशी साधार चर्चा करण्याकरिता राम मोहन यांनी ग्रीक व हिब्रू भाषांचा सखोल अभ्यास केला.,कारण मूळ बायबल हिब्रू व ग्रीक भाषांत लिहिले आहे.

हिंदू पंडितांना वाटले, की राममोहन ख्रिस्ती होणार; परंतु लवकरच हिंदूंचा भ्रमनिरास झाला. १८२० साली राममोहनांनी द प्रिसेप्टस ऑफ जीझस, द गाइड टू पीस अँड हॅपिनेस (येशूच्या आज्ञा, शांती व सुखाचा मार्ग) या नावाने ७० पृष्ठांचे एक इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. १८८१ साली नव्या करारातील चारही शुभवर्तमानांचे बंगालीत भाषांतर केले. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसारावर व उपदव्यापांवर जोराचा हल्ला केला.

४ डिसेंबर १८२१ रोजी ‘संवादकौमुदी’ हे एक साप्ताहिक बंगालीत सुरू केले. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांविषयक प्रश्नांचा आणि भारतीयांच्या राजकीय मागण्यांचा व तक्रारींचा ऊहापोह करणारे भारतीयाने सुरू केलेले हे पहिले नियतकालिक. भारतीय वृत्तपत्रव्यवसायाचा हा शुभारंभ होय. १८२२ साली मिरात-उल्-अखबार हे फार्सी साप्ताहिकही त्यांनीच सुरू केले. यामधील भाषा आणि विचार अतिशय प्रखर होते. याचवेळी सरकारने हुकूम काढला, की गव्हर्नर जनरलच्या परवान्याशिवाय कोणीही नियतकालिक काढू नये. हा हुकूम वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील पहिला हल्ला होता. राममोहनांना संताप आला. वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी सरकार दरबारी त्यांनी बराच काळ झगडा केला. राम मोहन यांच्या कामगिरीसाठी दिल्लीच्या बादशहाने त्यांना ‘राजा’ हा किताब दिला.
असे राजा राम मोहन रॉय. ते इंग्लंडला गेले असताना तिथे आजारी पडले व त्यातच २७ सप्टेंबर १८३३ रोजी त्यांचे ब्रिस्टन येथे निधन झाले. त्यांची समाधी तिथेच बांधण्यात आली. आधुनिक भारतीय समाज व शिक्षण यांची ओढ लागलेला विद्वान निघून गेला!

लेखक – भारतकुमार राऊत
लेखक राज्यसभेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.