भटके श्वान आणि त्यांचे मूर्ख पाठीराखे/प्रेमी
ब्लॉग

भटके श्वान आणि त्यांचे मूर्ख पाठीराखे/प्रेमी

आमच्या हैदराबादमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने भटक्या कुत्र्यांशी आणि त्यांना खाऊ घालणाऱ्या लोकांशी संबंधित टोकाच्या प्रतिक्रिया दोन्ही बाजूने येत आहेत. त्याबाबतीत काही गोष्टी विचार करण्यायोग्य आहेत

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

1) कुत्रा हे मानवाने पाळलेले कदाचित सर्वात पहिलं जनावर आहे. त्यामुळे कुत्र्याचे माणसावर आणि माणसाचे कुत्र्यावर प्रेम असणे हे इतिहासाला आणि सभ्यतेच्या विकासाला धरून आहे. त्यामुळे कुणी श्वानप्रेमी असण्यात काही वाईट नाही.

2) वाईट हे आहे की कुत्र्यांवर प्रेम करता करता एखादा माणूस दुसऱ्या माणसाचा तिरस्कार करायला लागतो. नेहमी लक्षात राहू द्या की माणसाच्या प्रेमात पडून कुठलाही कुत्रा इतर कुत्र्यांच्या जीवावर उठणार नाही कारण प्रत्येक species मध्ये आपल्या species बद्दल सर्वात जास्त प्रेम असते. पण घरातल्या पाळीव कुत्र्याला एखाद्या घरकाम करणाऱ्या माणसामुळे थोडा जरी त्रास झाला तरी मालक त्या नोकराला त्रास द्यायला मागेपुढे पाहत नाही. याला कारण म्हणजे मालक त्या कुत्र्याला स्वतःच्या मालकीचा प्रतिनिधी म्हणून पाहत असतो. सैन्यात अधिकारी लोकांच्या कुत्र्याला फिरवण्यासाठी, त्यांचा गु उचलण्यासाठी ऑर्डरली जवान असेच वापरले जातात आणि ते जवान त्यांच्या शिव्याही खातात.

3) माणसाच्या मेंदूचा जास्त विकास झाल्याने त्याला आपल्या आजूबाजूचे, सोबतचे प्राणीही तेवढेच विचार करतात वगैरे वाटू लागते. पाळीव प्राणी आपल्यावर प्रेम करतात हे सत्य आहे, कारण त्यांना आपण तसे वाढवलेले असते, पण याचा अर्थ हा नाही की त्यांच्यातला हिंसकपणा ते पूर्णपणे विसरून जातील. कुत्रा, मांजर यांची शिकार करण्याची वृत्ती नैसर्गिक आहे आणि ती त्यांना कितीही पाळीव बनवले तरी संपत नाही. तेव्हा आपला पाळीव प्राणी आपल्यासारखा विद्वान, भावनिक वगैरे आहे हे मनातून बाजूला काढा.

4) प्राण्यांचे वागणे हे आजूबाजूची परिस्थिती, अन्नाची उपलब्धता, त्यांचे वय यावर अवलंबून असते. तरुण वाघ शक्यतो माणसाला मारत नाहीत, पण म्हातारे वाघ माणसाला (विशेषकरून वृध्द आणि लहान मुलांना) मारतात कारण त्यांना हरणाची शिकार करणे अवघड जाते. घरातल्या कुत्र्यांना अन्न व्यवस्थित मिळत असल्याने ते हल्लेखोर बनत नाहीत, पण मोकाट कुत्र्यांना ही अन्नाची शाश्वती नसते आणि त्यामुळे अन्नाचा शोध घेता घेता आणि त्यासाठी एकमेकांत भांडता भांडता त्यांच्या नैसर्गिक हिंसक वृत्ती बाहेर पडतात.

5) भटक्या कुत्र्यांना खायला घातले तर थोडीच काय चुकलं? असे सांगणाऱ्या महाभागांनी हे ध्यानात घ्यावे की अशा प्रकारे ते भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अजुन मोठा करत आहेत कारण अन्नाच्या थोड्याशा उपलब्धतेने त्यांची संख्या वाढत जाते आणि परत मोठ्या संख्येत असलेल्या भटक्या कुत्र्यांना अन्नाची मोठी समस्या जाणवते. सिग्नलला भीक मागणाऱ्या लहान मुलांना जेव्हा आपण दया दाखवून भीक देतो तेव्हा आपण लहान मुलांची चोरी, त्यांना अपंग बनवून भिकेला लावणे याला खतपाणी घालत असतो त्यातला हा प्रकार आहे. जर खरंच तुम्हाला भटक्या कुत्र्यांवर प्रेम असेल तर अशी कुत्री आपल्या घरी आणा आणि त्यांना व्यवस्थित पूर्णवेळ पाळा. तुम्हाला कुणी अडवले आहे का?

6) भटक्या कुत्र्यांनाही जगायचा अधिकार आहे! आहेच की… पण मग तसाच अधिकार बिबट्या, वाघ, नाग वगैरे लोकांना द्या. ते आपल्या घराच्या बाजूने फिरायला लागले तर जवळ बोलवा, प्रेमाने कुशीत घ्या, त्यांना न्हाऊ-माखू घाला. चुकूनही सर्पमित्र, फॉरेस्टच्या लोकांना बोलवू नका. चालतंय का? नाही ना चालत, कारण तिथे जीवाची भीती आहे. मग जेव्हा भटकी कुत्री रस्त्यावरून जाणाऱ्या बाईक, सायकली, शाळकरी पोरे, म्हातारी माणसे यांना त्रास देतात, चावतात आणि काहींचे त्यात जीव जातात तेव्हा तुम्हाला काही का वाटत नाही? अच्छा अच्छा… तुम्ही कारने जाता होय, आणि तुमच्या सोसायटीत भटक्या कुत्र्यांना प्रवेश नाही होय! मग ठीक आहे!

हे बघ भाऊ/ताई, 5 रुपयांचा पार्ले जी रस्त्यावर कुत्र्यांना चारून तुला animal lover म्हणून सोशल मीडियातून जगाला दाखवायचा जो कंड आहे ना, त्यामुळे इतर लोकांना गंभीर ईजा होतात, 5 इंजेक्शन घ्यावी लागतात आणि काहींचे जीव जातात. तेव्हा कंड आवर आणि माणसात ये आणि माणसासारखा वाग!

– डॉ. विनय काटे