माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का? सर्व प्रश्नांची उत्तरे काय आहेत?
ब्लॉग

माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का? सर्व प्रश्नांची उत्तरे काय आहेत?

हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. अदानी समूहात ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना प्रचंड तोटा झाल्याचे चित्र आहे. यात वैयक्तीक गुंतवणुकदारांसोबत संस्थात्मक गुंतवणुकदारांचा देखील समावेश आहे. संस्थात्मक गुंतवणुकदारांमध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती भारतीय आयुर्विमा मंडळने केलेल्या गुंतवणुकीची होय. आता ज्या अर्थी LICने अदानी समूहात मोठी गुंतवणूक केली आहे त्या अर्थी त्यांचे देखील मोठे नुकसान झाले आणि यामुळेच LICची पॉलिसीधारकांमध्ये काळजीचे वातावरण तयार झाले. LIC पॉलिसी असलेले एकच प्रश्न विचारू लागले आम्ही पॉलिसीमध्ये गुंतवलेले पैसे बुडतील का? अदानींमुळे आमचे पैसे वाया जातील का? आम्ही घेतलेली पॉलिसी वाया जाईल का? थोडे थोडे पैसे जमा करून खरेदी केलेली पॉलिसी आता उपयोगाची राहणार नाही का? असे एक ना अनेक प्रश्न लोक विचारत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे काय आहेत?

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्गने २४ जानेवारी रोजी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. या रिपोर्टमध्ये अदानी समूहावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. अदानी समूहाने स्वत:च्या खात्यात अनेक हेरफेर केले आहेत. समूहने स्वत:च्या कंपन्यांचे शेअर ओव्हर प्राइस करून दाखवले आहेत. या रिपोर्टमध्ये अदानी समूहाला ८८ प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. या काळात अदानी समूहाचे शेअरमध्ये मोठी घसरण झाली. फक्त १० दिवसात अदानी यांनी ९ लाख कोटीहून अधीक रक्कम गमावली. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती म्हणजे अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची काळजी वाढली. देशातील सर्वात विमा कंपनीने अदानी समूहात मोठी गुंतवणूक केली आहे. इतरांप्रमाणे एलआयसीचे देखील नुकसान झाले. मात्र ही गुंतवणूक मोठी असल्याने नुकसान देखील मोठे आहे.

LIC बुडणार का?

एलआयसीने अदानी समूहात ३६ हजार ४७४.७८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हिंडेनबर्गचा रिपोर्ट प्रसिद्ध होण्याआधी या गुंतवणुकीची व्हॅल्यू ७७ हजार कोटी इतकी होती. अदानी समूहाच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीचा एलआयसीच्या कमाईवर नक्कीच परिणाम झाला आहे. पण हे नुकसान इतके मोठे आहे की LIC बुडेल. जर शेअरच्या किमतीमधील चढ उताराने कंपन्या बुडल्या असत्या तर रोज हजारो कंपन्या बुडल्या असत्या. एलआयसीने देखील स्पष्ट केले आहे की, अदानी प्रकरणात घाबरण्याची गरज नाही. एलआयसीची एकूण संपत्ती ४१.६६ लाख कोटींहून अधिक आहे. याचा अर्थ अदानी समूहातील त्यांची गुंतवणूक १ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

घाबरण्याची गरज नाही?

वरील गोष्ट अधीक सोप्या भाषेत समजून घेऊयात. व्यक्ती किंवा संस्था यांना तोपर्यंत तोटा होत नाही जोपर्यंत ते स्वत:कडील शेअर विकत नाहीत. LICने अदानी समूहामध्ये पैसे गुंतवले आहेत. आज अदानींचे शेअर घसरले आहेत आणि LICचे नुकसान होत आहे. उद्या या शेअर्सची किंमत वाढली तर नफा होईल. या प्रकारच्या फायद्या-तोट्याला नोशनल फायदा किंवा नोशनल तोटा असे म्हटले जाते. कारण हा नफा किंवा तोटा खरा नसतो. जेव्हा तुम्ही शेअर विकता तेव्हा फायदा किंवा तोट्याचा प्रश्न येतो. LICने आता अदानीचे कोणतेही शेअर विकले नाहीत. त्यामुळेच आता तोटा किती झाला किंवा किती होत आहे, याची चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही.

LIC पॉलिसीधारकांनी घाबरावे का?

जेव्हा कोणतीही व्यक्ती पॉलिसी खरेदी करते तेव्हा तुम्ही दिलेल्या हप्त्यातू जमा झालेले पैसे विमा कंपनी मार्केटमध्ये गुंतवतात, तेथून झालेल्या फायद्यातून तुमचे क्लेम दिले जातात. विमा कंपन्यांचा क्लेम परत करण्याचा वेग कमी असल्यामुळे ते मार्केटमध्ये दिर्घ काळाचा विचार करून गुंतवणूक करतात. याच एका कारणामुळे विमा कंपन्यांचा नेहमी हा प्रयत्न असतो की तुम्ही मोठ्या कालावधीचा विमा घ्यावा, तुमचे आयुष्य दिर्घकाळ असावे. जितके दिवस तुमचा पैसा विमा कंपनीकडे असेल तितके दिवस ते या पैशातून कमाई करतील.

अदानी ग्रुपमध्ये किती गुंतवणूक

LICने अदानी समूहाशिवाय अन्य अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. LICने शेअर बाजारातील ३६ कंपन्यांमध्ये १० लाख कोटींहून अधिक रक्कम गुंतवली आहे. जर अदानी समूहातील त्यांच्या गुंतवणुकीची तुलना केली तर ती १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. २० सप्टेंबर २०२२ पर्यंत एकूण AMU अर्थात असेट अंडर मॅनेजमेंट ४१ लाख ६६ हजार कोटी इतके होते. इथे AMUचा अर्थ असा पैसा जो विमा कंपन्या बाजारात मॅनेज करतात. अदानीमधील LICची गुंतवणूक ३६ हजार ४७४ कोटी आहे जी त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. गुंतवणूक कमी म्हणजे धोका देखील कमी.

LICने त्यांच्या गुंतवणुकीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. LICने स्पष्टपणे म्हटले आहे की, गुंतवणुकीसाठी संस्थांसाठी निश्चित केलेल्या रिक्स मॅनेजेमेंट फ्रेमवर्कच्या आतच ही गुंतवणूक देखील केली आहे. डिपार्टमेंट ऑफ इनव्हेस्टमेंट अॅण्ड पब्लिक असेट मॅनेजमेंटचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी वृत्त संस्था ANIशी बोलताना सांगितले की, एलआयसीच्या गुंतवणुकीबाबत आता घाबरण्याची गरज नाही. त्यांची गुंतवणुकी सुरक्षीत आहे.

एलआयसी एका सुरक्षित सिक्योरिटीजच्या अंतर्गत येते. त्यांच्याकडे रेटेड बॉन्ड्स आणि इक्विटी आहेत. ते एका सुरक्षित धोरणानुसार गुंतवणूक करतात. गुंतवणूक केलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये चढ-उतार नेहमीच पाहायला मिळते. याचा परिणाम विमाधारकांवर होताना दिसत नाही. LICने एक पब्लिक नोट प्रसिद्ध केली आहे. ज्यात आजच्या तारखेल त्यांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू सांगितली आहे. आता फक्त अदानी समूहाच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांच्या कमाईवर परिणाम होत आहे. जर तुमच्याकडे LICची पॉलिसी असेल तर इतकी काळजी करण्याचे कारण नाही. अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर LICच्या विमाधारकांनी अदानी प्रकरणावरून घाबरण्याची गरज नाही.

साभार – महाराष्ट्र टाइम्स