देव मी पाहिला! साऱ्यानेच अनुभवला! – मा. खासदार सुनिल गायकवाड.
ब्लॉग

देव मी पाहिला! साऱ्यानेच अनुभवला! – मा. खासदार सुनिल गायकवाड.

तसा मी आणि आमचा परिवार नास्तिकच लहान पणापासून आमच्या घरात फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध च कारण परम पूज्यनिय पिताजी दादा बळिराम शिवराम गायकवाड हे कासार सिरसी चे आमच्या दलीत समाजाचे पहिले विद्यार्थी…२२ नोव्हेंबर १९३० चा दादांचा जन्म परम पुज्यनिय बाबासाहेब आंबेडकरांसोबत दादांनी चळवळीत काम केलेले.. आई माझी अक्षर ओळख जरी नसली तरीही प्रचंड हुशार पण तीही कधीच कुठल्या देवाची पूजा केलेली मला आजपर्यंत दिसली नाही..असा आमचा नास्तिक परिवार.. अशा परिवारात माझा जन्म झाला.. आम्ही तीन भाऊ मोठे अनिलकुमार,मी मधला आणि आम्हा दोघांचा सदा विजय असो म्हणून ज्याचे नाव विजय ठेवले तो माझा छोटा भाऊ विजयकुमार असे आम्ही तीन भाऊ..चार बहिणी लीलाबाई, ललिता,पुष्पलता,मीना, असा आमचा परिवार..

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आपण म्हणाला की नास्तिक परिवार पण देव पाहिला अहो फक्त पाहिलाच नाही तर आम्ही अनुभवला आणि साऱ्या जगानेही तो पाहिला… हा देव म्हणजे माझे मोठे बंधू परम पुज्यनिय अण्णा अनिलकुमार बळिराम गायकवाड.अण्णाचा जन्म ३० ऑक्टोबर १९६३ कर्नाटकच्या तुगाव हलसी गावात आजोळी झाला. मांजरा नदीच्या काठावर वसलेले हे छोटेसे गाव.. पण आमचे आजोबा आजीच घराणं हे भीमा कोरेगावच्या लढाईत ज्या शूर सैनिकांनी पेशव्यांचा पराभव केला होता त्या सैनिकांच्या वंशजाचे.. माझी आजी सारजा केरबा तुळजापूरे त्या काळात स्वतःच्या घोड्यावर बसून रुबाबात फिरणारी माझी आजी.. त्या काळातही शाही थाटात राहणार आमचं आजोळ..

परम पूज्यनीय पिताजी दादा हैद्राबाद संस्थानमध्ये मॅट्रिक नंतर नोकरी काही वर्ष केले. आणि भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर दादांची नवीन नियुक्ती महाराष्ट्रमध्ये देवगाव परंडा तालुका जिल्हा उस्मानाबादला झाली. दादांचं गाव कासारसिरसी तालुका निलंगा . गावापासून देवगावला जायचे तर लातूर बार्शी ही मीटर गेजची रेल्वे होती,आणि बार्शी वरून देवगावला चालत जावे लागत असे ते अंतर जवळपास २२ मैल होते. माझी मोठी बहीण लीलाबाई आणि अण्णा हे दोघे असताना दादाची शिक्षकाची नोकरीसाठी देवगावला आले. तिथेही गेल्यानंतर गावच्या पोलिस पाटलांनी गुरुजी आपली राहण्यासाठीची व्यवस्था वाड्यावर करतो म्हणाल्यावर दादानी सांगितलं माझा समाज जिथं राहतो ती वस्ती दाखवा मी तिथं जाऊन राहतो. दादांनी आपल्या समाजाच्या लोकामधे एक झोपडीवजा घर तयार केले आणि तिथे दादा आपल्या लेकरासह राहायला लागले.

पुज्यनीय अण्णा लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि चाणाक्ष एक प्रसंग मला आठवतो दादांनी अनेक प्रसंग आम्हाला लहानपणी सांगीतले आहेत त्यातला एक प्रसंग आहे. अण्णा दादांचे खुप लाडके आणि सवयीचे होते दादाला सोडून अण्णा कधीच कुठे जात नव्हते. दादांना केंद्रात मीटिंगसाठी जायचे होते पण अण्णाला कळले तर दादांना जाऊ देणार नाहीत म्हणून दादा कुठेही जाताना जायचे तिकडे ना सांगता दुसरीकडे जायचे.अण्णा रेडिओ घेऊन बसले होते आणि त्या गावातील भोसले नावाचे एक व्यक्ती येऊन अण्णाला म्हणाला अरे रेडिओ नीट लाव!

अण्णा तसाच रेडिओ टाकले आणि दादा न गेलेल्या रस्त्यांनी जोरात धावत पळत सुटले अण्णा त्यावेळी तीन वर्षाचे असतील,माझी मोठी बहीण लीलाबाईला माहीत होते दादा कोणत्या दिशेने गेलेत.. बाई त्या दिशेनी पळत जाऊन दादांना परत घेऊन आली. आणि अण्णा ज्या दिशेनी गेले तिकडे दादांनी जाऊन अण्णा ला घरी घेऊन आले. दादांनी विचारलं अण्णाला काय झाले का पळत होता. अण्णा नी सांगितले या भोसले मामा नी मला “रेडिओ नीट लाव” असे ओरडले त्यांनी मला एकेरी बोलले आणि अण्णा नी दादाला सांगितल्यावर दादांच्या डोळ्यात पाणी आले नी दादा अण्णाला काखेत घेऊन लाड केले. आणि त्या दिवशी पासून ते दादा च्या अंतिम दिना पर्यंत दादा अण्णाला “अहो जाहो” नी बोलायचे.

अण्णा दररोज दादा सोबत शाळेत जायचे दादा जे विद्यार्थ्या ना शिकवत ते अण्णा ध्यान देऊन ऐकत असतं त्यामुळे अण्णा ला शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी पासूनच सगळं लिहायला आणि वाचायला येत होते. पूर्वी च्या काळात शाळा तपासण्यासाठी नादर साहेब येत असत. दादांची देवगाव ची शाळा तपासायला नादर साहेब आले होते. त्यांनी शाळेची आणि विद्यार्थी ची तपासणी केली तेव्हा अण्णा तिथेच दादा सोबत होते.

अण्णा ची चाणाक्ष बुध्दी लक्ष्यात घेऊन त्या नादर साहेबाला वाटले आपण या मुलाची परिक्षा घेतली पाहिजे. त्याने दादांना विचारले दादांनी हो म्हटल्यावर त्या नादर साहेबांनी ब्लॅक बोर्ड वर काहीही अक्षरे आणि गणित लिहले आणि ते अण्णा नी अचूक ओळखले त्याची उत्तरे दिली ते पाहून नादर साहेब हे खुश झाले आणि अण्णा चे बुद्धी आणि हुशारी पाहून त्या नादर साहेबांनी आदेश काढला की अनिलकुमार यांना सरळ दुसरी इयत्तेत प्रवेश देण्यात यावा. आणि अण्णा हे एकमेक उदाहरण असेल की बालवाडी आणि पहिली न शिकता सरळ दुसऱ्या वर्गात प्रवेश दिला गेला.त्याचा परिणाम असा झाला की अण्णा वयाच्या १३ व्या वर्षीच १० वी ची परीक्षा प्रथम श्रेणीत पास झाले.

अण्णाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर आठवी साठी उदगीर ला लाल बहादूर शास्त्री विद्यालय ला प्रवेश झाला आणि तिथे वसतिगृह मधे राहु लागले. एकदा दादा उदगीर ला अण्णा ला भेटायला गेले तेव्हा अण्णा ला तिथले जेवण आणि राहणी ठीक वाटत नव्हती म्हणून दादांनी अण्णा ची टी सी काढून आणली आणि आंबुलगा (वि) ला दादा ची नोकरी होती तिथून ९ किमी अंतर असेल्या मदंनानंद विद्यालय मदसुरी येथे प्रवेश दिला.अण्णा दररोज ९ किलोमिटर चालत किंवा सायकल वर ये जा करत असत. कधी मोठा पाऊस आला की ओढ्याला पुर आला की ओढ्याच्या कडेच्या झाडावर चडून उड्या मारून कसे तरी मार्ग काढून घर गाठायचे. कधी कधी तर अतिवृष्टी झाली तर शाळेला जाता ही यायचे नाही. अशा परिस्थितीत अण्णा नी त्यांचे हाईस्कूल चे शिक्षण पूर्ण केले आणि वयाच्या १३ व्या मॅट्रिक प्रथम श्रेणीत पास झाले.

अंबुलग्याला लातूर चे धमगुंडे गुरुजी होते. त्यांनी दादाला विनंती केली की अण्णा ला लातूर ला पुरनमल लाहोटी शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज ला प्रवेश देऊ या आणि इंजिनियर करू या. अण्णा प्रथम श्रेणीत पास झाले असल्यामुळे अण्णा चा प्रवेश पॉलिटे्निक कॉलेज ला झाला. तिथे ही सर्वात लहान वयाचा विद्यार्थी म्हणजे माझे अण्णा च. कॉलेज चेच वसतिगृह रोड क्रॉस करून समोरच होते. एके दिवशी अण्णा चा प्रॅक्टीकल चा क्लास होता त्यासाठी ड्रॉइंग बोर्ड घेऊन क्लास ला जायायचे होते. अण्णा पेक्षा बोर्ड मोठा हातात तर मावत नव्हता मग काय अण्णा नी तो बोर्ड सरळ डोक्यावर घेऊन रोड क्रॉस करून कॉलेज मध्ये प्रवेश करताना त्या कॉलेज च्या प्राचार्यांनी पाहिलं.. आणि प्राचार्यांनी आवाज देऊन अण्णा ला थांबवल आणि प्राचार्य म्हणाले अरे हे कॉलेज आहे आणि तु कुठे निघाला.

अण्णा नी सांगितलं मी प्रथम वर्ष चा विद्यार्थी आहे. प्राचार्यांना नवल वाटण साहजिक होते एवढा लहान मुलगा इथे कसे काय ? वाटण साहजिक होते.१३ वर्षाचा मुलगा खर तर आठवीत शिकण्याची वयामध्ये डिप्लोमा च्या प्रथम वर्षात प्रवेश. प्राचार्य नी लागलीच तिथल्या शिपायाला हाक मारली आणि सांगितले की आज पासून या विद्यार्थ्याचा बोर्ड तु घेऊन जायचा सोबत.. अण्णा मराठी माध्यमातून १० वी पास झालेले आणि त्यांच्या वर्गातील मुले काही १२ वी करून आलेले परंतु अण्णा नी तिथेही आपल्या हुशारी ची झलक दाखवली आणि डिप्लोमा सिव्हील च्या शेवटच्या परीक्षेत मराठवाड्यात दुसरे येण्याचा मान मिळवला. अण्णा लातूर ला शिकत असताना दादा अंबुलग्याहून अण्णा साठी घरी बनवलेले तूप घेऊन जायचे पण अण्णा त्यांच्या रूम पार्टनर ला खायला द्यायचे. खर तर अण्णा च अभ्यासात लक्ष लागावे म्हणून माझे मामा बाब्रुवान केरबा तुळजापूरे हे अण्णा सोबत त्यांच्या कडे जाऊन राहायचे.

मला आठवते तेव्हा लातूर साठी अंबुलग्या वरून बस नव्हती तरी दादा कधी कधी सायकल वर लातूर ला अण्णाला भेटायला जायचे.अण्णा चा डिप्लोमा पूर्ण झाला आणि अण्णा अंबुलग्याला आले. सुट्टी संपली आणि अण्णा चा निकाल आला अण्णा प्रथम श्रेणीत पास झाले तेव्हा आण्णा चे वय १६ वर्ष झालेलं. सोबत च्या मित्रांना नोकऱ्या लागल्या कारण त्यांचं वय १८ पेक्षा ज्यास्त होते आण्णाच वय मात्र नोकरी साठी कमी होत पण ऑर्डर मात्र अनेक आल्या होत्या.दादा मुख्याध्यापक असल्यामुळे अण्णाला जाऊ दिले नाहीत. नेमके त्याच वेळेस उमरगा येथे छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे टेक्निकल सुरू झाले होते. तिथे प्राध्यापक साठी अण्णा मुलाखत देऊन आले.

कॉलेज नी अण्णा ची निवड केली आणि वय जरी कमी असले तरीही आम्ही संस्थेकडून पगार देऊ असं सांगून अण्णा वयाच्या १६ व्या वर्षी प्राध्यापक झाले. त्यांचे विद्यार्थी अण्णा पेक्षा वयाने मोठे असलेले.. अण्णाला तर आणखी मिसी सुद्धा फुटली नव्हती. पण मला वाटते अण्णा प्राध्यापक झाले आणि परत अण्णा नी A.M.I E. च्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.त्या परीक्षे साठी फॉर्म भरताना ती परीक्षा पास आलेल्या मेंबर ची फॉर्म वर सही लागते ती घायायला त्यांच्या सरांकडे गेले असता अण्णा नी घेतलेले विषय बघून सर अण्णाला म्हणाले अरे गणित विषय कशाला घेतला मला जमला नाही. अण्णा म्हणाले सर आपणाला अवघड असेल मला नाही. आणि अण्णा गणित विषय घेऊनच प्रथम श्रेणीत AMIE पास झाले. अत्यंत अवघड अशी परिक्षा अण्णा पास झाले.

अण्णा प्राध्यापक असताना कॉलेज च्या स्नेहसंमेलन ला दादा कोंडके आले होते मी ही उमरगा ला गेलो होतो अण्णा सोबत.मी लहानच होतो उमरग्याहून दिवाळी ला येताना अण्णा माझ्यासाठी आणि माझा छोटा भाऊ विजयकुमार साठी फटाके आणि टिकली वाजवायचे पिस्तूल घेऊन यायचे.मी अण्णाला माझ्या साठी इलेक्ट्रोनिक घड्याळ आणायला सांगितले होते अण्णा नी ओमेक्स चे घड्याळ मला आणून दिले होते पण माझ्या कडून त्याचे बटण गळून पडले.ते बटन शोधण्यासाठी विजयकुमार नी खुप प्रयत्न केले पण काही सापडले नाही.मी अण्णाला जे जे मागितले ते ते मला दिले.

लहानपणापासून मी अण्णाला काहीही मागणारा आणि आमच्या कुटुंबातील मी एकटाच..!अण्णा चे आता सरकारी नोकरी च पण वय झाले १८ वर्ष पूर्ण झाले तेव्हा कॉलेज त्यांना सोडायला तयार नव्हते. अण्णाला इंजिनियर ची ऑर्डर आली इरिगेशचे ची तलवाडा तालुका गेवराई ला इंजिनियर म्हणून अण्णा नी उमरगा ची नोकरी सोडली आणि इंजिनियर म्हणून तलवाडा ला जॉईन झाले.

१९ व्या वर्षी इंजिनियर म्हणून अण्णा जॉईन झाल्यावर त्यांच्या ट्रेनिंग चा एक प्रसंग खुप महत्वाचा आहे असे मला वाटते. सगळे इंजिनियर ची ट्रेनिंग सुरू झाली होती वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण सुरू झाले होते आणि जो अधिकारी प्रशिक्षण देत होता तो चुकीचं शिकवत होता. अण्णा उठले आणि सांगितले सर आपण चुकीचं सांगत आहात. त्यांचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले आज काल चे पोर उठतात आणि काही बोलतात याला तर मिसी ही फुटली नाही असे म्हणले.. आपण सुरूच ठेवा.

परत ते चुकीचं माहिती देत होते मग मात्र अण्णा परत उभा टाकले आणि सांगितलं आपण चुकीचं सांगत आहात आणि अण्णा नी सगळ्यांना सांगितले कोणीही लिहून घेऊ नका तेव्हा मात्र त्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं अण्णा ला विचारलं ते चूक म्हणतो तर बरोबर काय ते तुला येते का? अण्णा नी होकार दिला आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ठीक आहे तु शिकऊन दाखव म्हणताच अण्णा नी ते पुस्तक न घेता तोंड पाठ शिकवले जो विषय अण्णा नी कॉलेज ला शिकवला होता त्यामूळे सगळे अवाक झाले. अधिकारी पण चकित झाले आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तिथेच जाहीर केले आज पासून सर्वांचे प्रशिक्षण अनिलकुमार गायकवाड घेतील. प्रशिक्षण घेण्यासाठी गेले आणि परिक्षण देऊन आले.

गायकवाड गुरुजींचा मुलगा इंजिनिअर झाला अशी चर्चा साऱ्या निलंगा तालुक्यात सुरू झाली. मग विषय आला अण्णाच्या लग्नाचा.. शेषेराव कांबळे यांनी एक स्थळ घेऊन अंबुलग्याला आले ते पहिलेच होते. आर सी एफ कंपनीत डी बी गुरधाळे यांच्या मुलीचं स्थळ म्हणजे माझ्या पुज्यनिय वहिनी जयश्री यांचं अण्णा सोबत लग्न आई दादांच्या पसंती ने ठरलं आणि नुकतेच इंजिनिअर झालेल्या वर्षीच वयाच्या १९ व्या वर्षी अंबुलगा (विश्वनाथ) येथे २२ मे १९८२ ला बौद्ध पद्धतीने स्वगृही मोठ्या थाटात विवाह संपन्न झाला.

विशेष म्हणजे विवाह विधी साठी भगवान गौतम बुद्ध यांचा फोटो अण्णा नी स्वतः स्केच केला होता. मोठा आणि अतिशय सुंदर हुभे हुभ गौतम बुद्ध. तेव्हा फोटोग्राफी आणि व्हिडीओ ग्राफी दुर्मिळच तरीही अण्णा च्या लग्नाच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढल्या होत्या. वहिनी लग्ना नंतर काही दिवस अंबुलग्याला राहिल्या होत्या.

अण्णांच्या लग्ना नंतर अण्णा नी निलंगा येथे बदली करून घेतली. लोवर तेरणा प्रकल्प ला ज्युनिअर इंजिनिअर म्हणून अण्णा जॉईन झाले. माकणी धरणाचं पाणी निलंगा तालुक्यात कॅनल नी आणायच्या कामात अण्णा चा खुप मोठं योगदान आहे.

अण्णा AMIE पास झाल्यामुळे ते पदवीधर इंजिनियर झाले. तेव्हा एमपीएससी नी क्लास वन च्या जागेची जाहिरात आली आणि अण्णा नी फॉर्म भरला परीक्षेची तयारी सुरू केली. आणि मी पण माझे लातूर चे सरकारी वसतिगृह दयानंद कॉलेज च्या पलीकडे शिफ्ट झाल्यामुळे मी १० वी साठी अण्णा कडे निलंगा ला प्रवेश घेतला. तेरना कॉलनी मध्ये राहत असताना अभिजित विश्वजित आणि अश्वजीत या तिन्ही लेकरान सोबत आणि अण्णा वहिनी यांच्या सोबत राहत होतो.

अण्णा चा एमपीएससी चा अभ्यास अण्णा लेकर आणि संसार करत रोज एकादी तास अभ्यास करत असत. पण अण्णा मुळातच अतिशय चाणाक्ष आणि बुद्धिमान असल्या मुळे अण्णा एमपीएससी ची अवघड परिक्षा कार्यकारी अभियंता वर्ग १ ची महाराष्ट्र मध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाले. वयाच्या २१ व्या वर्षी. एक विशेष होते मी अण्णा ची त्यावेळी आलेली ऑर्डर पाहिली आहे. निवड झालेल्या मध्ये फक्त अण्णा चा पत्ता असा होता की ज्या गावाला पोस्ट सुद्धा नाही.त्या ऑर्डर वर चा पत्ता होता.
अनिलकुमार बळिराम गायकवाड
राहणार- अंबुलगा (विश्वनाथ
पोस्ट- मदनसुरी,तालुका – निलंगा, जिल्हा- लातूर.

ज्या गावाला पोस्ट कार्यालय नाही एवढ्या छोट्या खेड्यातल्या मुलानी एवढ्या मोठ्या पदाची परिक्षा पास होणे हे आमच्या परिवारासाठी खुप मोठी अभिमानाची घटना आहे. निवड झाल्यानंतर पोस्टिंग साठी दोन वर्ष उशीर झाला मुंबई ला अण्णा ची पहिली पोस्टिंग ठाणे ला झाली. अण्णा वहिनी ना लेकरांना ठाणे ला घेऊन जाताना सोबत मी पण गेलो होतो. कोपरी कॉलनी मध्ये ११ /१ नंबर चा इंग्रजा च्या काळातील बंगला अण्णा ना मिळाला होता.

अण्णा मुळे आमच्या कुटुंबाला मुंबई बघायला मिळाली.तेव्हा एस टी महामंडळ च्या बस शिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मोबाईल नव्हते. फोन सुद्धा नव्हते. पत्र पाठऊन खुशाली विचारावे लागत होते. अण्णा ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग येथे कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना अनेक कामे केली पण आपला देश स्वतंत्र झाल्यापासून दिवा या गावाला कसलाही रस्ता नव्हता. अण्णा नी तिथे जाऊन का रस्ता होत नाही याची चौकशी करण्यासाठी गेले असता चा प्रसंग सांगितले होते मला आठवते साईट वर अण्णा गेले

पाहणी करत असताना गावाकडे जसे मूल विटी दांडू घेऊन कोणी आले तर जवळ येऊन थांबतात तसे काही लोक बंदुकी घेऊन जवळ येऊन थांबले होते. त्यातला एक म्हणाला काय साहेब रस्ता करताय का? अण्णा म्हणाले काय अडचण आहे. तो माणूस गुंड प्रवृतीचा दिसत होता आणि यापूर्वी कोणता इंजिनियर तिथे जाण्याची हिंमत केली नव्हती, एकानी केली होती तर त्याला मारून याच माणसांनी परत पाठवले होते असे तो अण्णाला म्हणाला. त्याचा प्रॉब्लेम काय ते अण्णानी विचारले त्याचे शेत आणि विहीर रस्त्यात येत होते त्यामुळे तो रस्ताच होऊ देत नव्हता.

अण्णा च्या लक्षात आले आणि अण्णा नी त्याला सांगितले तुझी विहीर वाचवतो आणि शेत ही आणि रस्त्याचं काम ही तूच करायचे असे अण्णा नी त्याला सांगितल्यावर तो रस्त्याचा प्रश्न सुटला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा दिवा गावाला ४६ वर्षानंतर रस्ता हा अण्णामुळे झाला. अण्णा नी त्या माणसाची मानसिकता ओळखून ते काम करून घेतले असे अनेक उदाहरण माझ्या कडे आहेत.

अण्णा चे बांधकाम खात्यात खुप मोठे योगदान आहे. जे जे अवघड कामे ते सगळे अण्णा नी केले आहेत. दिल्ली चे महाराष्ट्र सदन ची रिकामी जागा घेऊन ते पूर्ण वास्तू ही अण्णा च्याच हातावर झाली. एक विशेष म्हणजे सरकारचा एक रुपया सुद्धा न खर्च करता.. अतिशय सुंदर अशी दिल्ली तील एकमेव वास्तू आज अण्णाच्या कार्याची पावती आहे.

मुंबई बांद्रा सी लिंक ही अण्णा च्याच हातावर झालेले एक उकृष्ठ काम आहे.
असे अनेक कामे तर केलीच पण मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी बांधकाम मंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते ठाणे या ईस्टर्न एकसप्रेस वे वर जेवढे उड्डाण पूल तयार झाले ते सगळे अण्णा च्या कार्यकाळात पूर्ण झाले आहेत. हजारो लोकांना अण्णा नी वेग वेगळ्या पद्धतीने मदत केली आहे. अण्णा म्हणजे सगळ्या लाभ धारकांसाठी देवच.. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे या म्हणी प्रमाने अण्णा कडे काम मागायला येणाऱ्या ना अण्णा नी काम मागणाऱ्या च्या अपेक्षे पेक्षा ज्यास्तच कामे दिले. अण्णा त्यांच्या साठी देवच.. मला असे अनेक लोक भेटतात अण्णाला आपला देव मानतात. देवासाठी काहीपण म्हणणारे सुद्धा मला भेटले.

२००९ ची लोकसभा ही लातूर ची sc साठी राखीव झाली तेव्हा मी माझ्या पुज्यनिय दादांना आणि पुज्यनिय अण्णाला विनंती केली मला लातूर लोकसभा ची निवडणूक लढायची आहे. मला दोघांनी ही परवानगी दिली. मी सांगितलं मला भा ज पा कडून लढायचे आहे. आणि मी जेव्हा लोकसभेच्या उमेदवारी साठी च्या मुलाखतीला गेलो तिथे आमदार देवेंद्र फडणवीस आणि आमदार पांडुरंग फुंडकर यांनी माझी मुलाखत घेतली होती. तेव्हा अण्णांचे नाव मी माझे सख्खे मोठे बंधू आहेत असे सांगितल्यावर दोघे ही म्हनाले आम्ही त्यांना ओळखतो आम्हाला ते नेहमी मदत करतात असे म्हणाले. अण्णा ची सर्वत्र ख्याती ही सर्वांना मदत करनारे व्यक्तिमत्त्व म्हणून आहे. मला लोकसभा तिकिट मिळाले आणि तीन हजार च्या फरकानी माझा पराभव झाला. तेव्हा एकच चर्चा होती “भाऊ असावा तर अनिलकुमार जसा” अण्णा च्या आशीर्वादा नी मी मोठी फाईट दिली. स्वतः विलासराव देशमुख म्हणाले होते मला की आपण जोरात फाईट दिली.

पुन्हा २०१४ ची निवडनुक आली मी मुंडे साहेब यांच्या कडे गेलो आणि मला लोकसभेचे तिकीट द्या म्हणालो तेव्हा मुंडे साहेब म्हणाले अरे ही जागा आपल्या दृष्टीने “क” विभागात आहे म्हणजे निवडून येण्याची कसली ही शक्यता नसलेला मतदार संघ. मी साहेबाना म्हणलो साहेब मला संधी द्या मी निवडून येऊन दाखवतो. आणि मला तिकीट मिळाले आणि मराठवाड्यात सर्वाधिक मतांनी माझा विजय झाला.

खूप काही प्रसंग आहेत लिहण्यासारखे पण अनेक मान्यवराची लेख या ग्रंथात आहेत. पूज्यनिय अण्णा नी वयाच्या ४१ वर्ष या देशाची सेवा केली आहे. राज्याच्या अनेक महत्वपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभगाची जे ऐतेहासिक कामे झाली आहेत ते अण्णा वीणा पूर्ण झाले नाहीत.

पुणे मुंबई एक्स्प्रेस वे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग मुंबई नागपूर तर पूज्यनिय अण्णाच्या कार्य कुशलतेने पूर्ण झालेले आहे. खुप मोठी यादी आहे कामाची… माझी आई म्हणते अनिल नी खुप वर्ष नोकरी केली आहे आता सगळे मिळून त्यांना आराम द्या.. आई सोबत मी लातूर ला आता बराच वेळ असतो सकाळी दुपारी संध्याकाळी मला फोन करून जेवण करायला बोलावते आणि मी आई जेवण मिळून करतो तेव्हा ती प्रत्येक वेळेच्या जेवताना मला सांगत असते ..अरे..तुम्हा दोघाला मिळालेला भाऊ जगात नाही असा आहे.. एवढं प्रेम करणारा आणि तुझी कुठलीच गोष्ट न टाळणारा भाऊ जगात दुसरा कोणी असूच शकत नाही.. त्याला तुम्ही दोघे भाऊ कधीच दुखऊ नका आणि त्याच्या शब्दाच्या बाहेर मरेपर्यंत कधीच जाऊ नका… असच एकत्र रहा असे रोज मला माझी आई सांगत असते…

मी सुरुवातीलाच सांगीतल होत आम्ही नास्तिक पण आमच्याच परिवारात देव अण्णा चा जन्म झाला.. देवाची आता मला कोणी व्याख्या विचारली तर मी सांगतो मी देव पहिला आहे.. त्यांचं दर्शन आशीर्वाद मला कायम मिळाला आहे.. ते देव माझे परमपूज्यनिय अण्णा अनिलकुमार बळिराम गायकवाड… आज मी खुप शिक्षण घेतलं माझ्या शिक्षणाचं वर्ल्ड रेकॉर्ड झाल.. पूज्यनिय अण्णा नी आमच्या घरात सांगितलं टंप्या ला जेवढे शिकायचं तेवढं शिकू द्या.. अण्णा मला लहानपनपासून लाडानी टंपू म्हणतात.. आज ही मला अण्णा टंपू म्हणूनच बोलतात…मला आई दादा अण्णा वहिनी च्या आशीर्वादाने जगातल्या १६० देशाच्या खासदार प्रतिनिधी समोर भारत सरकार चा प्रतिनिधी म्हणून भारतच प्रतिनिधित्व करून साऊथ अमेरिका च्या पार्लमेंट मधे भाषण करण्याची संधी मिळाली.

एवढेच नाही तर भूतान ला एशियन कंट्री च्या २१ देशाच्या सोशल जस्टीस स्टँडिंग कमिटी च्या ही कॉन्फरन्स ला भारत सरकार चा प्रतिनिधी म्हनून तिथं ही आपल्या देशाचं नाव रोशन केलं. तिथं तर कॉन्फरन्स चा स्पीकर माझ्या जवळ येऊन माझ्या तिथल्या कामगिरी साठी शाबास्की दिली आणि म्हणाले “वन मॅन इज इनफ”.हा माझा जागतिक स्तरावरील गौरव हा माझा नाही तर तो भारत देशाचा माझ्या परिवाराचा होता तो पुज्यनिय अण्णा चा गौरव होता.. आज मी फक्त आणि फक्त परम पूज्यनिय अण्णा मुळेच आहे… हे माझ्या जीवनाचं सूत्र कोणीही चूक ठरऊ शकत नाही:
सुनील – अनिल = शून्य ( सुनील मायनस अनिल बरोबर शून्य)

अण्णा आज तुमचा ५८ वा वाढ दिवस आपणाला कोटी कोटी शुभेच्छा.. आणि माझे आयुष तुम्हालाच लाभो.. आपण निरोगी दीर्घायुष्य जगावे आणि असीच आपली कीर्ती जगामध्ये कायम राहावे…

तुमचाच टंपू.
डॉ सुनील बळीराम गायकवाड.
माजी खासदार लातूर लोकसभा
आपला छोटा भाऊ.