करोना निर्बंधांबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; RTPCR चाचणीबाबत ‘हा’ निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

करोना निर्बंधांबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; RTPCR चाचणीबाबत ‘हा’ निर्णय

मुंबई: परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या करोनाप्रतिबंधक निर्बंधांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियमावलीत असलेली तफावत दूर केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ओमायक्रॉन या नव्या घातक व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता आपण अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे पवार म्हणाले. मात्र परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काल केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या नियमावलीत काही फरक होता. त्यावर रात्री उशिरा आमची महत्वाची चर्चा झाली. परदेशातून भारतातील कोणत्याही विमानतळावर प्रवासी आल्यानंतर त्यांच्यासाठी एकच नियम असावा असा आमचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.

देश म्हणून सगळीकडे नियमात समानता असावी, असेही पवार पुढे म्हणाले. इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांना आपल्या आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट द्यावा लागतो. आपण जेव्हा इतर राज्यात जातो तेव्हा आपला आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट आवश्यक असतो, तर मग आपल्या राज्यात येणाऱ्यांसाठीही तो आवश्यकच असेल, असेही पवार पुढे म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या लांबलेल्या संपावर देखील भाष्य केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होत असून याचा एसटी कर्मचाऱ्यांनी विचार केला पाहिजे असे पवार म्हणाले. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा केलेली आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन हे तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना केलं आहे.