लसीसाठी आम्ही पैसे मोजतो, मग मोदींचा फोटो कशाला?
कोरोना इम्पॅक्ट

लसीसाठी आम्ही पैसे मोजतो, मग मोदींचा फोटो कशाला?

नवी दिल्ली: कोरोनाच्या लसीसाठी आम्ही पैसे खर्च करतो, मग लसीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो कशाला? असा सवाल करीत केरळच्या नागरिकाने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. लसीच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवण्यात यावा, अशी विनंती आरटीआय कार्यकर्ते पीटर म्यालीपराम्बिल यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

व्यक्तिगत लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापणे म्हणजे आमच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. सरकारी लसीकरण केंद्रावर लस मिळाली नाही. त्यामुळे नाइलाजाने खासगी रुग्णालयात 750 रुपयांची लस घ्यावी लागली. लसीसाठी आम्हाला पैसे मोजावे लागत असतील तर मोदींना आमच्या प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो छापण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे म्हणणे पीटर यांनी मांडले आहे.

आरटीआय कार्यकर्ते पीटर यांनी अमेरिका, इंडोनेशिया, इस्रायल, कुवेत, फ्रान्स आणि जर्मनी या देशांतील लसीकरण प्रमाणपत्राच्या प्रती न्यायालयात सादर केल्या आहेत. इतर देशांत कुठेही प्रमाणपत्रावर पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांचा फोटो छापण्यात आलेला नाही. केवळ भारतात देशाच्या खर्चावर ‘वन मॅन शो’चा दिखावा आहे. हे मोदींच्या प्रसिद्धीचे अभियान आहे, असा आरोप याचिकेत केला आहे.

केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. सुरेश कुमार यांनी याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला यावर आपलं म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस दिली आहे.