लसीचा दुसरा डोस घ्यावाच लागणार, नाहीतर…
कोरोना इम्पॅक्ट

लसीचा दुसरा डोस घ्यावाच लागणार, नाहीतर…

पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीचा (Covid Vaccination) पहिला डोस शंभर टक्के देण्यात आला असला तरी नागरिकांनी दुसरा डोसही लवकरात लवकर घ्यायला हवा. त्यासाठी प्रशासनानं तयारी केली आहे, पण नागरिकांनी सहकार्य न केल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील,’ असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा वार्षिक समिती, जिल्हा नियोजन समिती तसंच, कोविड आढावा बैठक पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘जिल्ह्यात १ कोटी ३८ लाख लस मात्र दिल्या गेल्या आहेत. पहिला डोस शंभर टक्के लोकांना दिला गेला आहे. ओमिक्रॉनला अटकाव करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. पॉझिटिव्ह आलेले काही रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. पुणे जिल्ह्यात आलेल्या सात पैकी ५ निगेटिव्ह आले आहेत. हे सगळे बाहेरच्या देशातून आले होते. बाहेरच्या देशातून आलेल्या आणखी लोकांना शोधण्याचं काम सुरू आहे. प्रशासन सतर्क आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी पुणेकरांना आश्वस्त केलं.

‘ मागील १० दिवसात लसीकरणाचा वेग वाढला आहे. दिवसाला ६० हजारांपेक्षा जास्त लसीकरण होत आहे. लसीकरणाबाबत नागरिक अगोदर गंभीर नव्हते, आता नागरिक जागरूक झाले आहेत. दोन डोस घेतलेल्याना ओमिक्रॉनची भीती नसते. त्यामुळे दोन्ही डोस घेतले पाहिजेत. दुसऱ्या डोससाठी यंत्रणा कामाला लावून लसीकरण करून घेण्याच काम करत आहोत. लोकांनी सहकार्य केलं नाही, मदत केली नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील,’ अशी ताकीदही त्यांनी दिली.

शाळांबाबत राज्य स्तरावर निर्णय

‘ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळं निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांबाबत निर्णय घेतला जाईल. स्थानिक स्तरावर शाळा सुरू करण्याचे अधिकार दिल्यास पुन्हा वाद होतात. त्यामुळं राज्य स्तरावर निर्णय घेण्यात येईल. त्या त्या वेळेची परस्थिती पाहून निर्णय घेतले जातील, असं ते म्हणाले. कोविड प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोसबाबत देशाच्या पातळीवर झाला पाहिजे. सिरमकडे बूस्टर डोस उपलब्ध आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.