गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; महिला मदतीला धावल्या, हुल्लडबाजांना दांडक्यांनी आवरलं
मनोरंजन

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; महिला मदतीला धावल्या, हुल्लडबाजांना दांडक्यांनी आवरलं

मागील काही दिवसांपासून नर्तिका गौतमी पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. या घटना ताज्या असताना आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही तरुणांनी धुडगूस घातला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुण्यातील खेड तालुक्यातील भैरवाडी येथे रीलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमस्थळी ‘सबसे कातील, गौतमी पाटील’ असं लिहिलेले पोस्टर झळकले होते. या कार्यक्रमात काही तरुणांनी धुडगूस घातला आहे. यावेळी गौतमीच्या अदाकारीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, तरुणांच्या एका टोळक्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. यामुळे गौतमी पाटील आणि आयोजकांवर कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली. मात्र, हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा यासाठी गावातील महिलांना पुढाकार घेत हातात काठ्या घेऊन उभे राहण्याची वेळ आली.

ग्रामीण भागामध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच तरुण कार्यक्रम सुरू असताना गोंधळ घालत असल्याने अनुचित प्रकार घडताना पहायला मिळतात. खेड तालुक्यात देखील या कार्यक्रमादरम्यान तरुणाने गोंधळ करत धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ कार्यक्रम बंदही करावा लागला. मात्र, कार्यक्रम चांगला पार पडावा यासाठी या गावातील महिलांनी हातात काठ्या घेऊन तरुणांना आवरण्याचा प्रयत्न करत कार्यक्रमास काठ्या घेऊन उभ्या राहिल्या. त्यामुळे कार्यक्रम पुन्हा सुरु होऊ शकला. प्रेक्षकांनी गौतमीच्या अदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षभरात सोशल मीडियामुळे गौतमी पाटील हिची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. गौतमी पाटील लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य करत असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. त्यामुळे गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. यावर गौतमीने आपली बाजू मांडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काही ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना विरोधही होतो.

विशेष म्हणजे यापूर्वीही अनेकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी धुडगूस घातला आहे. अशाच प्रकारचा गोंधळ संबंधित कार्यक्रमात पाहायला मिळाला. पण यावेळी मात्र गावातील महिलांनी हातात काठ्या घेऊन धुडगूस घालणाऱ्या तरुणांना चोप दिला आहे.