मनोरंजन

पाली हिलच्या कार्यालयानंतर कंगनाच्या फ्लॅटवर बीएमसीचा डोळा

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतने राज्यसरकारविरोधात भाष्य केल्यानंतर मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिल भागातील कार्यालयावर कारवाई करत हातोडा मारला. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने कंगनाचे खारमधील राहत्या घरावर आपला मोर्चा वळवला आहे. न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी बीएमसीने हालचाली सुरु केल्या आहेत. तर दुसरीकडे कंगनाच्या ऑफिस आणि घरावरील कारवाईवर नेटकऱ्यानीही प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तिच्या ऑफिस आणि घरावरील कारवाई वरून ट्वीटर वर सध्या #shameonBMC चा ट्रेंड सुरु झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईतील खाररोडवरील डिब्रीझ अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर कंगना रानौतचे घर आहे. या घरामध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने२०१८ मध्ये कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती. या नोटीसीविरोधात कंगनाने दिंडोशी कोर्टात दाद मागितल्यानंतर कोर्टाने कंगनाची बाजू ऐकून घेत पुढील कारवाईस स्टे दिला होता, तर पालिकेला यावर सविस्तर बाजू मांडण्यास सांगितले होते.

मात्र गेल्या दोन वर्षात पालिकेने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. परंतु आता कंगनाला कोंडीत पकडण्यासाठी बीएमसी’ने हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच या प्रकरणी दिलेला स्टे मागे घेण्याची विनंतीही कोर्टाला केली आहे. कोर्टाने स्टे उठवल्यास कंगनाच्या ऑफिसपाठोपाठ तिच्या राहत्या घरावरही बीएमसीकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली. यावर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला. तसेच “मणिकर्णिका फिल्म्सच्या कार्यालयात पहिला चित्रपट ‘अयोध्या’ जाहीर झाला. माझ्यासाठी ही इमारत नाही, तर एक राम मंदिर आहे, आज बाबर तिथे आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल. पुन्हा राम मंदिर पाडले जाईल, पण बाबर, हे लक्षात ठेव, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम” असे ट्वीट कंगनाने केले.

तर कंगनाने दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे सांगत बीएमसीने वांद्र्याच्या पाली हिल परिसरात असलेले कार्यालय पाडणार असल्याचे स्पष्ट केल. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी आज (ता. ९ ) सकाळी 11 वाजताच्या सुमारास टाळे तोडून तिच्या कार्यालयात प्रवेश केला. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली.तथापि, आधीच पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने कंगना अडचणीत आली होती. आता नंतर कंगनाने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केल्याने हे प्रकरण अधिकच चिघळणार असल्याची शक्यताहि वर्तविण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत