व्हेनेटी बसच्या नावाखाली कपिल शर्माला ५.७ कोटींचा गंडा
मनोरंजन

व्हेनेटी बसच्या नावाखाली कपिल शर्माला ५.७ कोटींचा गंडा

मुंबई : दिलीप छाब्रिया यांच्या डीसी डिझाइन्स कंपनीचे नवनवीन कारनामे उजेडात येत आहेत. अभिनेता कपिल शर्मा यालाही छाब्रिया यांनी साडेपाच कोटींचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. व्हेनेटी बस तयार करून देतो सांगून, कपिल शर्माची फसवणूक करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्वतःच बनविलेल्या महागड्या गाड्या स्वतःच खरेदी करायच्या, एकाच चेसिस आणि इंजिन नंबरची वेगवेगळ्या ठिकणी नोंदणी करायची आणि त्याआधारे एकाच वाहनावर अनेकदा कर्ज घेऊन ते बुडवायचे अशाप्रकारचा अनोखा वाहन घोटाळा मुंबई पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. भारताची पहिली स्पोर्ट्स कर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डीसी डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण?
या प्रकरणाचा तपास करीत असताना, डीसी कंपनीसोबत कपिल शर्माचे आर्थिक व्यवहार झाल्याचे समजताच त्याला माहिती देण्यासाठी गुरुवारी पोलिस आयुक्त कार्यालयात बोलविण्यात आले. त्यावेळी छाब्रिया यांनी आपल्यालाच फसविल्याचे कपिल याने सांगितले. ५ कोटी ३० लाख रुपये देऊन कपिलने मार्च २०१७ मध्ये एक व्हेनेटी बस बनवून देण्याची ऑर्डर दिली. २०१८ मध्ये व्हॅटचे जीएसटी झाल्यामुळे आणखी ४० लाख रुपये छाब्रिया यांनी कपिलकडून घेतले.

२०१९ उजाडले तरी गाडी तयार न झाल्याने कपिलने ‘एनसीएलटी’कडे याबाबत तक्रार केली. यानंतर डीसी कंपनीचे बँक अकाउंट्स गोठविण्यात आले. इतके होऊनही अकाउंट गोठविल्याने ६० लाख रोख रकमेची व्यवस्था कर, लगेच गाडी बनवून देतो असे छाब्रिया यांनी सांगितले. मात्र, कपिलने त्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या छाब्रिया यांनी गाडीच्या अर्धा सांगाड्याचे पार्कींगचे पैसे म्हणून १२ लाखांचे बिल कपिलला पाठविले. त्यामुळे अखेर सप्टेंबर २०२० मध्ये कपिलने आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली.