लवकरच येतोय दृश्यम 2; उलगडणार सत्संगचं रहस्य
मनोरंजन

लवकरच येतोय दृश्यम 2; उलगडणार सत्संगचं रहस्य

मुंबई : मूळ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असलेल्या दृश्यम या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे या चित्रपटाचा पुढील भाग म्हणजे दृश्यम 2 देखील आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांचा दृश्यम 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आता याचा हिंदी रिमेकदेखील लवकरच येणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्रसिद्ध निर्माते कुमार मंगत यांनी दृश्यम 2चे हक्क खरेदी केले आहेत. यासाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दृश्यममधील पुढील भाग दाखवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे जिथे ही कथा संपते तिथूनच दृश्यम 2ची पुढील कथा सुरु होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातही तब्बू आणि अजय देवगण मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत. या दोघांनीही या चित्रपटासाठी होकार दिला आहे. २०२१ च्या शेवटी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण आणि कुमार मंगत या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

दरम्यान, दृश्यम हा चित्रपट मूळ मल्याळम असून यात अभिनेते मोहनलाल मुख्य भूमिकेत झळकले होते. तर या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकला होता. तसंच या चित्रपटाचं दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केलं होतं. दरम्यान, अजय देवगण आणि तब्बू यांचा दृश्यम हा चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच लक्षात असेल. या चित्रपटाने चाहत्यांसोबत समीक्षकांचीही मनं जिंकली होती.