’83’ या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची ठरली तारीख
मनोरंजन

’83’ या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची ठरली तारीख

मुंबई : २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित 83 हा चित्रपट लवकरच रिलीज होणार असून चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान 83 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

83 हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रणवीर सिंगने इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. 83 चित्रपट ४ जून २०२१ रोजी हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लवकरच चित्रपटगृहांमध्ये भेटूया या आशयाचे कॅप्शन रणवीरने पोस्टर शेअर करत दिले आहे.

या पूर्वी 83 हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.