गोव्यात उद्यांपासून १५ दिवस कर्फ्यू; या मालिकांचं चित्रीकरण पुन्हा रखडलं
मनोरंजन

गोव्यात उद्यांपासून १५ दिवस कर्फ्यू; या मालिकांचं चित्रीकरण पुन्हा रखडलं

पणजी : देशात कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात ९ मे ते २३ मे या कालावधीसाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संदर्भात आज(ता. ०७) घोषणा केली आहे. कर्फ्यू कालावधीत मेडिकल पुरवठा सुरू राहणार आहे. याशिवाय घरगुती सामानांची दुकानं सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच, रेस्टॉरंट सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत टेकअवे ऑर्डर स्वीकारू शकतील. या संदर्भात उद्या विस्तृत आदेश काढला जाईल. असं देखील मुख्यमंत्री सावंत म्हणाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सावंत यांनी सांगितले की, राज्यात पॉझिटिव्हीटी रेट आणि मृत्यू दर वाढत आहे. राज्यात ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा नाही. उद्या (ता. ०८) सायंकाळी ४ वाजता राज्यस्तरीय कर्फ्यू संदर्भात आदेश जारी केले जातील.

महाराष्ट्र सरकराने चित्रिकरणावर बंदी आणली होती. यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी अनेक मराठी मालिकांचं तसचं रिअ‍ॅलिटी शोचं चित्रीकरण राज्याबाहेर गोवा, दमण, सिल्वासा या ठिकाणी सुरू करण्यात आलं. दरम्यान गोव्यातील फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्यात सुरू असलेल्या चित्रिकरणाला विरोध दर्शवला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेत मालिका आणि सिनेमाच्या शूटिंगवर बंदी घातली आहे. 10 मे पर्यंत गोव्यात मराठी मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईत शूटिंगवर बंदी आणल्यानंतर आई माझी काळू बाई, रंग माझा वेगळा, सुख म्हणजे नक्की काय असतं, अग्गंबाई सूनबाई, अशा अनेक मालिकाचं तसंच सूर नवा ध्यास नवा या रिअ‍ॅलिटी शोचं शूटिंग गोव्यात सुरु होतं. सर्व प्रकारची काळजी घेत हे चित्रीकरण सुरू होतं. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे चित्रीकरण बंद करण्यात आलं आहे. गोव्यात शूटिंग सुरू झाल्याने प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या अनेक मालिकांचे नवे भाग पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. मात्र आता पुन्हा चित्रिकरणात खंड पडल्याने अनेक निर्मात्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.