अजय देवगणच्या गाडीची अडवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक
मनोरंजन

अजय देवगणच्या गाडीची अडवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक

मुंबई : अभिनेता अजय देवगण यांचे वाहन अडविल्याप्रकरणी राजदीप सिंग (वय २८) विरोधात गुन्हा दाखल करून दिंडोशी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन का देत नाही, असा जाब विचारत सिंगने अजय देवगणची गाडी अडवली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अजय देवगण सकाळ-सकाळी फिल्म सिटी येथे निघाले होते. मालाड पूर्वेला संतोषनगर परिसरात वाहतूक कोंडी असल्याने त्यांच्या वाहनाचा वेग कमी झाला होता. यावेळी सिंग हा रिक्षाने निघाला होता. देवगण यांना पाहताच तो रिक्षातून खाली उतरला आणि त्यांच्या गाडीला समोर गेला. तुम्ही गाडीतून खाली उतरा, मला तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणून त्याने गाडी अडविली. तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा का देत नाही, असा जाब विचारू लागला.

यावेळी देवगण यांचे सुरक्षा रक्षक वाहनातून खाली उतरले. त्यानंतर सिंग आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी झाली. याप्रकरणी देवगण यांच्या सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांकडून सिंगला अटक करण्यात आली आहे.