रामायण’ फेम अभिनेत्याचे ९८व्या वर्षी निधन
मनोरंजन

रामायण’ फेम अभिनेत्याचे ९८व्या वर्षी निधन

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता चंद्रशेखर वैद्य यांचं आज (ता. १६) निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जातं आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांनी मुंबईतील अंधेरीच्या आपल्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांना आपल्या शेवटच्या क्षणी आपल्या कुटुंबांसोबत राहायचं होतं आणि त्यांची ही इच्छा पूर्णदेखील झाली. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका रामायणमध्ये ते सुमंतच्या भूमिकेत दिसून आले होते. यामध्ये ते सर्वात ज्येष्ठ कलाकार होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

50 च्या दशकामध्ये सहाय्यक कलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात करणाऱ्या चंद्र्शेखर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपटांत मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आहे. 1953 मध्ये व्ही. शांताराम यांच्या सुरंग या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी कवी, मस्ताना, काली टोपी, लाल रुमाल, स्ट्रीट सिंगरसारख्या अनेक चित्रपटात ते मुख्य अभिनेता म्हणून झळकले होते. त्यानंतर त्यांनी शराबी, शक्ती, डिस्को डान्सर, नमक हलाल सारख्या चित्रपटांत सहायक अभिनेता म्हणून काम केलं आहे.

एबीपीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या नातु विशाल शेखरने म्हटलं की, त्यांना अनेक दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांना जुहूच्या क्रिटी केयर रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र ताप कमी आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना ही वेळ आपल्या कुटुंबांसोबत घालवायची होती. त्यामुळे घरीच त्यांच्यासाठी सर्व नर्सिंग व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आज झोपेतच आजोबा आम्हाला सोडून गेले.