इतिहास

असा झाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धर्मांतर सोहळा

नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्मस्वीकाराच्या सोहळ्यासाठी साचीच्या स्तूपाचा आकार देऊन शुभ्र वस्त्रांकित व्यासपीठ तयार केलं होतं. त्यापुढे दोन भव्य मंडप उभारलेले होते. बौद्ध धर्माचा निर्देश करण्यासाठी निळ्या , तांबड्या , हिरव्या पताका व ध्वज सर्वत्र लावलेले होते. नवायानाचा अर्थात बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यासाठी १४ ऑक्टोबरच्या सकाळी सुमारे ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी सविताबाई आणि सहाध्यायी रट्टू व इतरांसह दीक्षाभूमीवर पोहोचले. तेव्हा त्यांनी नवीन पांढरं रेशमी धोतर , पांढरा सदरा आणि वर पांढरा शुभ्र लांब कोट असा पेहराव केला होता . सविताबाईंनीही पांढरं लुगडं परिधान केलं होतं. सुमारे तीन लाखांच्या जनसागराने त्यांचं उत्साहाने स्वागत केलं .अनेकांनी उत्साहाने त्यांना व्यासपीठावर नेलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका हातात सोटा घेऊन व दुसरा हात सहाध्यायी रट्टूच्या खांद्यावर ठेवून ते मंचावर दर्शनासाठी उभे राहिले , तेव्हा लाखो अनुयायांनी टाळ्यांचा कडकडाट केला. व्यासपीठावरील एका टेबलावर लहानशी कास्याची बुद्धमूर्ती ठेवलेली होती. व्यासपीठावर ‘महाबोधी’चे कार्यवाह देवप्रिय वालीसिंह सारनाथचे थेरो भिक्खू सद्धातीसा , भिक्षू परमशांती , सामथचे संघरत्ना, साचीचे पन्नातिसा, हुबळीचे परमशांती भिक्खू पण्णानंदा हे बौद्ध धर्मोपदेशक बसले होते .

त्या दिवशी डॉ. आंबेडकरांच्या वडिलांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटं स्तब्धता पाळली गेली . त्यानंतर आंबेडकर शपथ घेण्यासाठी बुद्धमूर्तीसमोर नतमस्तक झाले . महास्थवीर चंद्रमणी व इतर ४ भिक्खूनी पाली भाषेत आंबेडकर व त्यांच्या पत्नी सविताबाई यांच्याकडून ‘बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छमि, संघ सरणं गच्छामि ‘ हे शरणत्तयं व इतर पंचशीले म्हणवून घेतली. त्यानंतर पाली भाषेतील मंत्र आंबेडकरांनी मराठीत म्हटले. त्यांनी बुद्धमूर्तीला पुष्पहार घातल्यावर त्यांचं बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं घोषित झालं आणि ‘ भगवान बुद्ध की जय ‘, ‘ बाबासाहेब आंबेडकर की जय ‘ या लाखोंच्या जनसागराने केलेल्या घोषणांनी आसमंत दुमदुमून निघाला .

या प्रसंगी माजी न्यायाधीश एम . भवानीशंकर नियोगी आणि डॉ . आंबेडकरांचे महाराष्ट्रातील काही सहकारी उपस्थित होते . त्याचप्रमाणे ब्रह्मदेशचे ( आजचे म्यानमार ) यू . बा . स्वे , ‘ सिलोन’चे ( श्रीलंकेचे ) एच.डब्ल्यू . अमरसूरिया , कोलकात्याचे अरविंद बारुआ आदींनी आंबेडकरांना स्वागतपर संदेश पाठवले होते , पण भारतातील संसदीय पक्षांच्या बहुतांश ज्येष्ठ नेत्यांनी या सोहळ्यापासून अंतर राखणंच पसंत केलं होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत