हैदराबादचं नाव खरोखर भाग्यनगर होतं काय? इतिहासकारांनी नेमकं काय म्हटलंय?
इतिहास

हैदराबादचं नाव खरोखर भाग्यनगर होतं काय? इतिहासकारांनी नेमकं काय म्हटलंय?

नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात अनेक मुद्यांवर दावे प्रतिदावे करण्यात येतात. इतिहासकारांच्या वेगवेगळ्या दाव्यांमुळं नवे पेच निर्माण होतात. तेलंगाणाची राजधानी हैदराबादचं नामांतर भाग्यनगर करण्यासाठी भाजपनं वातावरण निर्मिती सुरु केली आहे. हैदराबाद महापालिका निवडणुकीपासून या मुद्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादचा भाग्यनगर असा उल्लेख केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील भाग्यनगर असाच उल्लेख केला. मात्र, नागरिकांच्या खरंच हैदराबादचं यापूर्वीचं नाव भाग्यनगर होतं का असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जर, भाग्यनगर नाव होतं तर ते कोणत्या राजानं बदललं. भागमती कोण होती जिच्या नावावर शहराचं नामकरण भाग्यनगर करण्यात येणार आहे. या प्रश्नांची उत्तर इतिहास संशोधकांनी यापूर्वीच दिलेली आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हैदर-ए-कर्रार वरुन हैदराबाद
हैदराबाद आणि भाग्यनगर नावांबद्दलच्या प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायची असल्यास इतिहासाची पानं उलटून पाहणं आवश्यक आहे. कुतुबशाही राज्यकर्त्यांनी हैदर-ए-कर्रार नावावरुन शहराचं नाव हैदराबाद ठेवल्याचं इतिहासकारांनी सांगितलं आहे. कुतुबशाही राज्यकर्ते हे शिया राज्यकर्ते होते. मोहम्मद पैंगबरांचे जावई हजरत इमाम अली यांना हैदर-ए-कर्रार ही पदवी देण्यात आली होती. हैदर या शब्दाचा अर्थ सिंह असा होतो. हैदराबाद याचा अर्थ सिंहांच शहर असा होतो.

भागमती आणि कुली यांची प्रेमकथा
हैदराबाद शहराचं पूर्वीचं नाव भागमती होतं, त्यानंतर भाग्यनगर करण्यात आलं, असं काही लोक मानतात. भाग्यनगर हे नाव गोवळकोंडा येथील सुल्तान मोहम्मद कुली कुतुबशाह आणि त्याची प्रेयसी भागमती हिच्या नावावरुन पडल्याचा दावा केला जातो. कुतुबशाहनं त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर प्रेयसी सोबत लग्न केलं आणि नवं शहर निर्माण केलं त्याचं नाव भाग्यनगर ठेवलं. या दाव्यानुसार भागमतीनं लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आणि नाव बदलून हैदर बेगम ठेवल्याचा दावा केला जातो.

भाग्यनगरचा उल्लेख असणारे पुरावे आढळत नाहीत?
भाग्यनगर विषयी अनेक दावे करण्यात आले आहेत. इतिहासकारांनी त्यांच्या दृष्टिकोणाप्रमाणं मांडणी केली. इतिहासाच्या उपलब्ध असलेल्या साधनांमध्ये भाग्यनगरचा उल्लेख आढळत नाही. कुतुबशाहीच्या काळातील नाण्यांवरुन शहराच्या स्थापनेपासूनच याचे नाव हैदराबाद असल्याचं दिसून येते. कुतुबशाहीच्या काळात हैदराबादला भाग्यनगर म्हटल जात नव्हतं. हैदराबादचे संस्थापक कुली कुतुब शाह यांनी सुरु केलेल्या पाच नाण्यांवर हैदराबाद असाच उल्लेख आढळतो.

कागदपत्रांमध्ये दावे प्रतिदावे
हैदराबादच्या सलारजंग संग्रहालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या लेखात एक उल्लेख आढळतो. इतिहासकार नरेंद्र लूथर यांनी १९९२-९३ मध्ये प्रकाशित केलेल्या ऑन द हिस्ट्री ऑफ भाग्यमतीमध्ये भाग्यनगरच्या दाव्याचं समर्थन केलं आहे. त्यामध्ये हैदराबादचं नाव भाग्यनगर आहे, असं ते म्हणतात.

इतिहासकार मोहम्मद कासिम फरिश्ता यांनी मुस्लीम राजवटींच्या उदयावर एक पुस्तक लिहिलं आहे. सुल्तानाला भाग्यमती आवडू लागल्यानं शहराचं नाव भाग्यनगर ठेवलं आणि नंतर हैदराबाद केल्याचा दावा करण्यात आला आहे. १६८७ मध्ये प्रकाशित झालेल्या डच अधिकारी जीन डे थेवनॉट यांनी त्यांच्या ‘द ट्रॅव्हल्स इन टू द लिवेंट’ मध्ये कुतुबशाहीचा राजवटीच्या राजधानीचं शहर भाग्यनगर असल्याचा उल्लेख केला आहे. इराणी लोक भाग्यनगरला हैदराबाद म्हणत असा देखील उल्लेख आहे.

बागेच्या नावावरुन शहराचं नाव?
हैदराबाद नावासंदर्भात आणखी एक दावा केला जातो. गोवळकोंडा साम्राज्यातील श्रीमंत लोक जुन्या शहरातील अस्वच्छतेला कंटाळून मुसी नदी किनारी आले, तिथे त्यांनी मोठी घरं आणि उद्यानं निर्माण केली. नरेंद्र लूथर यांनी हा दावा फेटाळला आहे. बाग शब्दाचा वापर योग्य असेल तर शहराचं नाव बागनगरम असलं पाहिजे होतं असं लूथर म्हणतात. नरेंद्र लूथर यांनी हा दावा १६ व्या शतकातील ज्योतिषी बाबाजी पंथूलु यांच्या रायवाचकम पुस्तकाच्या आधारे केला आहे ज्यामध्ये शहराचं नाव बागनगरम सांगितलं गेलं आहे. नरेंद्र लूथर यांच्या दाव्यानुसार रायवाचकमची एक प्रत तामिळनाडूच्या पुदुकोट्टई ग्रंथालयात आहे.

भागमतीवरुन आणखी एक कथा
भागमतीसंदर्भात एक लोकप्रिय कथा प्रचलित आहे. कुतुबशाही वंशातील पाचवा राजा मोहम्मद कुली हिंदू मुलगी भागमती हिच्यावर प्रेम करत होता. भागमती चनचलम नावाच्या गावात वास्तव्यास होती. त्याच गावात सध्या चारमिनार आहे. मोहम्मद कुली भाग्यमतीला भेटण्यासाठी गोवळकोंड्यावरुन नदी ओलांडून येत होते. त्यामुळं मोहम्मद कुली यांच्या वडिलांनी म्हणजेच इब्राहिम यांनी मूसी नदीवर १५७८ मध्ये पूल बांधला. १५८० मध्ये कुली कुतुबशाह यांनी भागमती हिच्याशी लग्न केलं तिचं नाव भागमतीवरुन हैदर महल केलं, असा दावा केला जातो.

भाग्यनगर विषयी आणखी एक दावा
हैदराबादला भाग्यनगर म्हणण्यामागं आणखी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे इथली संपत्ती त्यामुळं त्याचं भाग्य म्हणजेच नशिबाशी जोडलं जातं. हिरे आणि मोत्यांचा व्यापार, मुघलांच्या चलनी नाण्याच्या तुलनेत गोवळकोंडा साम्राजाच्या चलनी नाण्याचं मूल्य अधिक होतं. ही बाब त्याच्याशी जोडली जाते. मात्र, भाग्यनगर हे संस्कृत नाव २० व्या शतकाच्या पूर्वी आढळत नाही.

भागमतीकथा, हैदर महलचं काय?
इतिहासकार सफीउल्लाह यांच्यामते भाग्यमती कथा सांगणारे तिच्या अस्तित्वाबद्दल समकालीन पुरावा देऊ शकलेले नाहीत. पांडू लिपी, शिलालेख, नाणी, मकबरा कबर यामध्ये हैदर महल कुठेही आढळत नाही. दोन चित्रांचा दाखला जातो मात्र ती १८ व्या आणि १९ व्या शतकातील आहेत. भागमती १६ व्या शतकातील असल्याचा दावा केला जातो. मोहम्मद कुली आणि भागमती यांच्या विवाहाचे ऐतिहासिक पुरावे आढळत नाहीत,असं सफीउल्लाह म्हणतात. कुतुबशाही कबरस्तानमध्ये देखील भागमती ची कबर आढळत नाही, असं ते म्हणतात.

भाग्यलक्ष्मी मंदिर
चारमिनारजवळ भाग्यलक्ष्मी मंदिर आहे. भाग्यनगर नावाचं समर्थन करणाऱ्यांचा ते मंदिर खूप जुनं असल्याचा दावा आहे. दुसऱ्या गटाचं चारमिनारजवळी मंदीर गेल्या चार दशकांपूर्वी बांधण्यात आल्याचा दावा आहे. चारमिनारच्या जुन्या फोटोंमध्ये मंदिर आढळत नाहीत. २०१३ मध्ये भारतीय पुरातत्व विभागानं त्या मंदिराची निर्मिती १९५९ नंतर करण्यात आली असल्याचं सांगितलं होतं.