इतिहास

त्यावेळी बाबासाहेबांनी मुंबई वाचवली होती; पण, पुन्हा केंद्रातील गुजरात्यांचा मुंबईवर डोळा

मुंबई : केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या विचारांचे किंवा पक्षाचे सरकार असले की मोठ्या प्रमाणांवर वाद होताना दिसतात. एकमेकांवर कुरघोड्याही होतात. अशावेळी आता राज्यात आणि केंद्रात दोन वेगवेगळी सरकारे स्थापन झालेली आहेत. आणि म्हणूनच केंद्र विरुद्ध राज्य असा वाद स्पष्ट दिसत आहे. त्यासोबतच गुजरात्यांचा नेहमी अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर डोळा राहिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रा. हरी नरके यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कशा प्रकारे काही काळापूर्वी मुंबई वाचवली होती ते सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रा. हरी नरके आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात….

संयुक्त महाराष्ट्र साकार होण्यापुर्वी मुंबई कोणाची? गुजरातची की महाराष्ट्राची? हा वाद पेटला असताना, तमाम बुद्धीजिवी मुंबई गुजरातची किंवा स्वतंत्र, अशी भुमिका मांडत होते. तेव्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई महाराष्ट्राचीच, असे सबळ पुराव्यांनिशी सिद्ध केले. त्यांनी १९४८, १९५३ आणि १९५५ साली या विषयावर संशोधनपर लेखन केले. ते इतके बिनतोड होते की, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणार्‍या, मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणार्‍या मंडळींची बोलतीच बंद झाली.

आज पुन्हा एकदा केंद्रातील काही गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे. अशावेळेला मुंबईला गिळंकृत करण्यापासून वाचवण्यासाठी दुसऱ्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ताकदीचे संशोधन, पुराव्यांचे बळ, साधार-तर्कशुद्ध युक्तिवादच महाराष्ट्राच्या कामी येणार आहे. मुंबईतील व्यापार, उद्योग आणि आर्थिक विश्व गुजरात्यांच्या ताब्यात असल्याने मुंबई गुजरातची तर मुंबई ना महाराष्ट्राची ना गुजरातची, ती स्वतंत्रच हवी म्हणणारे काय दावा करीत होते, त्यांचा तो दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ते बघूयात.

बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर नऊ प्रश्न उभे केले.

१. मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा काय आहे?
२. मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर म्हणता?
३. मराठी भाषकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असे कसे म्हणता येईल?
४. काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे?
५. मुंबई हे व्यापारी बेट असल्याने ते एकट्या महारष्ट्राचे नाही तर ते सर्व भारताचे आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे?
६. मुंबईचा व्यापार-उदीम गुजरात्यांनी उभा केलाय, मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत, म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे?
७. मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता यावे, आयते खाता यावे यासाठी महाराष्ट्र मुंबईवर दावा करतोय हे खरे आहे काय?
८. बहुभाषिक राज्य चांगले असते कारण तिथे अल्पसंख्यक भाषकांना अभय असते हे बरोबर आहे काय?
९. राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको हा दावा योग्य आहे काय?

याची उत्तरे देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भुगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले.

चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऎतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केले, गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेले नाही. अरबी समुद्रालगतचा भुगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे, गुजरातचे नाही. मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही, म्हणून मुंबई मधला काही काळ मराठा साम्राज्यात नसल्याने काहीच बिघडत नाही.

बाबासाहेब पुढे म्हणतात, १९४१ च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषकांची लोकसंख्या ५१ टक्के होती. आहे. ब्रिटीशांचे राज्य आल्यापासून सार्‍या भारतातून लोक रोजगार, व्यापार, उदीम यासाठी मुंबईत आले. वसले. त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले हा त्यांचा गुन्हा झाला काय?

बाबासाहेबांनी हे सिद्ध केले की गुजराती मूळचे मुंबईचे नाहीत तर गुजरातचे आहेत. जसे पोर्तुगिज, ब्रिटीश, फ्रेंच, डच मुंबईत स्वत:हून आले तसे गुजराती आलेले नाहीत. तर ब्रिटीशांनी त्यांना ” मध्यस्थ-दलाल” म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले. ब्रिटीशांनी गुजराती व्यापार्‍याबरोबर केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला. १६७१ सालचा म्हणजे शिवरायांच्या काळातले हे करारपत्र आहे. शिवाय महाजनसभा आणि ब्रिटीश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी समोर आणला. त्यानुसार, गुजरात्यांना राहण्यासाठी, व्यापारासाठी, गुदाम अणि कारखाने काढण्यासाठी फुकट जमिन देण्यात आली. व्यापारात करसवलत देण्यात आली. जहाजे आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आले.

तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत याचे लिखित पुरावेच बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले. हा प्रहार गुजरात्यांच्या वर्मी लागला.

मुंबईत जसा त्यांनी व्यापार उदीम केला तसाच तो त्यांनी कलकत्त्याला केलेला आहे. शिवाय बिहारच्य खाणीतही ते मालक आहेत. म्हणून कलकत्ता किंवा खाणींचा भाग असलेला बिहार गुजरातला जोडणार काय?
मुख्य मुद्दा आहे तो मुंबईला पाणी कोण पुरवतो? गुजरात की महाराष्ट्र?
ज्या विजेवर हे व्यापार, उदीम, कारखाने चालतात ती वीज कुठून येते महाराष्ट्रातून की गुजरातमधून?
कामगार शक्ती कुठली आहे?
आणि म्हणून वीज, पाणी, कामगार शक्ती महाराष्ट्राची तर मुंबईवर मालकी महाराष्ट्राचीच.

अशा रितीने सर्वच्या सर्व नऊ प्रश्नांची उत्तरे फाडफाड तोंडावर फेकून त्यांनी गुजरात्यांची बोलतीच बंद केली. हा सगळा भाग बाबासाहेबांच्या पुस्तकांमधूनचा तुम्ही वाचायला हवा. पुराव्यांचे बळ, संशोधनाची ताकद आणि साधार, तर्कशुद्ध युक्तीवाद यांची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला त्यामागे जशी हुतात्म्यांचे, चळवळीतल्या आधी सांगितलेल्या नेत्यांचे योगदान आहे, तितकेच मोठे योगदान या लढाईत दोन मौलिक ग्रंथ लिहिणार्‍या बाबासाहेबांचेही आहे. त्यांची आठवण महाराष्ट्राने जशी ठेवायला हवी तशीच ती बाबासाहेबांचीसुद्धा ठेवायला हवी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत