अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे कोसळले शेअर्स; एनएसडीएलच्या कारवाईचे पडसाद
काम-धंदा

अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे कोसळले शेअर्स; एनएसडीएलच्या कारवाईचे पडसाद

नवी दिल्ली : शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने तीन परदेशी गुंतवणुकदारांवर कारवाई केली आहे. एनएसडीएलने कारवाई केलेल्या या तिन्ही परदेशी गुंतवणूकदारांकडून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची खातीच एनएसडीएलने सील केल्यानं याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून आले आणि अदानी ग्रुपच्या कंपन्याचे शेअरचे भाव कोसळले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अदानी ग्रुपच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी गुंतवणुकदारांची खाती एनएनडीएलने गोठवली. या तिन्ही गुंतवणूकदारांनी अदानी समुहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जवळपास ४३ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांची खाती सील केल्यानं याचा थेट परिणाम अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या समभागांवर झाला आहे. कंपन्यांच्या समभागांचे भाव पडले आहेत.

एनएसडीएलने अलबुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेंस्टमेंट फंड या तिन्ही गुंतवणूकदारांची खाती गोठवली आहे. गुंतवणूकदारांच्या वेबसाईटवर याविषयीची माहिती दिलेली असून, एनएसडीएलने ३१ मे किंवा त्याआधी खाती गोठवली असावीत, असं म्हटलेलं आहे.