काम-धंदा बातमी महाराष्ट्र शेती

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, राधाकृष्ण विखे-पाटलांचा सवाल

टीम ई-चावडी
मुंबई : मुख्यमंत्री पक्षातील फक्त नेत्यांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाडय़ा खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी विचारला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही, त्यामुळे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. आता केवळ बैठकांचा फार्स करू नका. दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर, शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येऊन धडकेल, असा इशारा विखे पाटलांनी दिला आहे.

कालपासून (ता. १) दुधाला दरवाढ मिळण्यासाठी राज्यातील दुध उत्पादक संघटनांनी विविध ठिकाणी आंदोलन केले. तर आ. विखे यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शहरातील रास्ता रोको आंदोलन केले. नगर-मनमाड रस्त्यावर घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीच दूध दरवाढ करण्यास विरोध करीत असल्याचा आरोप करत त्यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की, ‘दूध अनुदानाच्या महाघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे करण्यात येणार आहे.

मात्र दुसरीकडे, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात जमावबंदीचा आदेश असताना बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहाता पोलिसांनी राधाकृष्ण विखे, अण्णासाहेब म्हस्के, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.