मुंबईत होळी आणि धुलिवंदन मोठ्या प्रमाणात साजरे होत असल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. सुमारे ११ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत तैनात करण्यात येणार आहे. अठराशे अधिकारी आणि नऊ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष असणार असून कुणीही कायदा हातामध्ये घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
मुंबईत गृहनिर्माण सोसायटी, उत्सव मंडळे, बैठ्या चाळी तसेच नाक्यानाक्यावर होलिकोत्सव साजरा केला जातो. १३ मार्चला होळ्या पेटविण्यात येणार आहेत तर दुसऱ्या दिवशी १४ मार्चला धुलिवंदन साजरे केले जाणार आहे. लहान मुले, महिलांसह सर्वसामान्य मुंबईकर मोठ्या संख्येने हा उत्सव साजरा करतात. यादरम्यान काही समाजकंटक गैरप्रकार करून या उत्साहाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. महिलांची छेड काढणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, अश्लील शेरेबाजी असे प्रकार घडतात. जातीय तेढ निर्माण होईल अशीही कृत्ये केली जातात. हे सर्व टाळण्यासाठी आणि जातीय सलोखा टिकविण्यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत.
मुंबईतील चौपाट्या, गर्दीच्या ठिकाणी विशेष गस्त ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणे ओळखण्यात आले असून त्यादृष्टीने बंदोबस्तासाठी फिक्स पॉइंट नेमण्यात आले आहेत. मद्यपी वाहन चालक, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या व्यक्ती, महिलांशी गैरवर्तवणूक करणारे, अमली पदार्थाची विक्री, सेवन करणारे यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेसाठी ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून सण जल्लोषात साजरा करावा, असे पोलिसांनी म्हटले आहे.
असा असेल फौजफाटा…
■ ०७ अतिरिक्त पोलिस आयुक्त
■ १९ पोलिस उपायुक्त
■ ५१ सहायक पोलिस आयुक्त
■ १७६७ पोलिस अधिकारी
■ ९१४५ पोलिस अंमलदार
■ एसआरपीएफच्या तुकड्या
■ शीघ्र कृती दलाची पथके
■ बॉम्ब शोधक आणि नाशक पथक
■ होमगार्ड जवानांची मदत