उद्यापासून कर्नाटकमध्ये १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन
देश बातमी

उद्यापासून कर्नाटकमध्ये १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन

बंगळुरु : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. तरीही कोरोनाचे आकडे काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांवर ताण वाढू लागला आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण दूर करण्यासाठी आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (२७ एप्रिल) १४ दिवसांचा लॉकडाऊन राज्यात असणार आहे. उद्या रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. दुकानं सकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत अर्थात ४ तास सुरु असतील. त्यानंतर दुकानं बंद असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. त्या व्यतिरिक्त इतर सेवा पूर्णपणे बंद असतील असं सांगण्यात आलं आहे. तर बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्राला परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे. त्याचबरोबर राज्य आणि राज्याबाहेर यात्रा करण्याची परवानगी नसेल. अत्यावश्यक प्रकरणात सूट दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर दारुच्या होम डिलिव्हरीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

कर्नाटक देशातील तिसरं कोरोना प्रभावित राज्य आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत १४ हजारांहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये एका दिवसात २९ हजार ४३८ रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. तर एका दिवसात २०८ जणांनी कोरोनामुळे जीव गमवला आहे. यापूर्वी दिल्ली, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आहे.