गणेशोत्सवादरम्यान पुण्यात जमावबंदीचे आदेश; १४४ लागू
पुणे बातमी

गणेशोत्सवादरम्यान पुण्यात जमावबंदीचे आदेश; १४४ लागू

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवादरम्यान पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरामध्ये १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत १४४ कलम लावण्यात आलं आहे. पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी, प्रार्थनास्थळंबंद ठेवण्यासंबंधी तसेच संचारास मनाई करणारे आदेश लागू केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये रस्त्यात, सार्वजनिक जागेत, सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोर ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इ.) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश १० सप्टेंबरपासून ते १९ सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल अशा इशारा पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.

मानाच्या गणेश मंडळांसह सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने यंदाही उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना शुक्रवारी (१० सप्टेंबर) दुपापर्यंत होणार आहे. प्रतिष्ठापनेआधी मिरवणूक निघणार नसली, तरी या गणपतींचे दर्शन ऑनलाइन माध्यमातून घेता येणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम यांच्या फेसबुक पेजवर, तर तुळशीबाग मंडळाच्या यूट्यूब पेजवर प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि श्रींच्या दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.