देशात संपूर्ण लसीकरणासाठी लागणार एवढे दिवस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात संपूर्ण लसीकरणासाठी लागणार एवढे दिवस

नवी दिल्ली : भारतात सोमवारी ८५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले. ही संख्या ५ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या लसीकरणाच्या जवळपास दुप्पट आहे. या नव्या विक्रमामुळे भारतात ऑगस्ट महिन्यापर्यंत दररोज एक कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दररोज जर ७५ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले तर १८ वर्षांवरील सर्व प्रौढांचे म्हणजे ९४.०२ कोटी लोकांचे लसीकरण होण्यास भारताला २०७ दिवसांचा कालावधी लागणार आहे. २० जूनपर्यंत २२.८७ कोटी लोकांचे अंशत: लसीकरण झाले आहे तर ५.१२ कोटी लोकांचे पूर्णत: (दोन्ही मात्रा) लसीकरण झाले याचा अर्थ २८ कोटी लोकांचे अंशत: अथवा पूर्णपणे लसीकरण झाले. याचा अर्थ देशात अद्याप जवळपास ६६.०२ कोटी लोकांचे लसीकरण करावे लागणार आहे, म्हणजे ६६.०२ कोटी मात्रांची अंशत: लसीकरणासाठी तर १३२.०४ मात्रांची पूर्ण लसीकरणासाठी गरज आहे. जर आता देशात दररोज ७५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले तर संपूर्ण प्रौढ व्यक्तींच्या अंशत: लसीकरणासाठी ८८ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

संपूर्ण प्रौढ लोकांचे पूर्ण लसीकरण करण्यासाठी भारताला ८८.८९ कोटी लोकांचे लसीकरण करावे लागणार आहे. त्यापैकी २२.८७ कोटी लोकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे आणि पूर्ण लसीकरणासाठी आणखी तेवढय़ाच मात्रांची गरज आहे. ज्या ६६.०२ कोटी लोकांचे लसीकरण झालेले नाही त्यांच्यासाठी १३२.०४ कोटी लस मात्रांची गरज आहे. जर दररोज ७५ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले तर ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशा ६६.०२ कोटी लोकांना लशीच्या दोन मात्रा देण्यासाठी १७६ दिवस लागणार आहेत आणि त्यामध्ये दोन मात्रांमधील अंतर आणि लसीकरण न झालेल्या २२.८७ कोटी लोकांसाठी लागणारे ३१ दिवस पाहता देशवासीयांचे पूर्ण लसीकरण होण्यासाठी २०७ दिवसांचा कालावधी लागणार आहे.