२५ देशांकडून भारताकडे कोरोनावरील लशीची मागणी
कोरोना इम्पॅक्ट बातमी

२५ देशांकडून भारताकडे कोरोनावरील लशीची मागणी

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र कायम आहे. त्यामुळे प्रत्येकाला कोरोनावरील लसीची आवश्यकता आहे. भारताने आतापर्यंत १५ देशांना कोविड-१९ प्रतिबंधक लशीचा पुरवठा केला असून आणखी २५ देशांकडून भारतात तयार करण्यात आलेल्या लशीला मागणी आहे, असे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एस जयशंकर म्हणाले, की भारताकडे लशीची मागणी करणाऱ्यात गरीब देश, किमतीचा विचार करणारे देश व औषध कंपन्यांशी थेट करार करणारे देश अशा तीन प्रवर्गातील देशांचा समावेश आहे. सध्यातरी भारताने १५ देशांना लशीचा पुरवठा केला असून आणखी २५ देशांनी लशीची मागणी केली आहे. त्यांच्या लस पुरवठ्याची प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांत आहे. त्यामुळे आता लस निर्मिती व पुरवठ्यात भारत जागतिक नकाशावर आला आहे.

काही गरीब देशांना अनुदानाच्या स्वरूपात लस पुरवण्यात येत असून काही देश भारत सरकारने ज्या किमतीत लस खरेदी केली त्या किमतीत लस घेऊ पाहत आहेत. काही देश थेट औषध कंपन्यांशी करार करू इच्छित आहेत. त्यांनी व्यावसायिक पातळीवर वाटाघाटी केल्या आहेत. केंद्र सरकारने आधीच भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व ऑक्सफर्डची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशिल्ड या लशींना मान्यता दिली असून १६ जानेवारीपासून भारतात लसीकरण सुरू झाले आहे. रेड्डीज औषध कंपनीने रशियाची स्पुटनिक ५ लस तयार करून त्यासाठी युरोपात परवाना मागण्याचे ठरवले आहे.