महाराष्ट्रातील २५ गावांचे सरपंच, ग्रामस्थ म्हणतायेत आम्हाला तेलंगणात समाविष्ट करा; TRSकडून निवडणूक लढवणार अन्…
बातमी मराठवाडा

महाराष्ट्रातील २५ गावांचे सरपंच, ग्रामस्थ म्हणतायेत आम्हाला तेलंगणात समाविष्ट करा; TRSकडून निवडणूक लढवणार अन्…

नांदेड : नांदेडमधील धर्माबाद तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि समर्थकांची नुकतीच बासरमध्ये बैठक झाली. या बैठकीत तेलंगणा राज्यामध्ये सामील होण्याबाबत अनुकुलता दर्शविण्यात आली. तसेच तेलंगणा राष्ट्र पार्टीचे उमेदवार उभे करुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जोमाने लढविण्याचा निर्धार करण्यात आला. तेलंगणातील के.सी.आर सरकारने राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात प्रवेश करताना तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाच्या माध्यमातून तेलंगणा सरकार महाराष्ट्र व देशाच्या अन्य भागात विविध योजना राबविणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

धर्माबाद तालुक्यातील अनेक सरपंच व ग्रामस्थांनी तेलंगणा सरकारच्या विविध योजनांमुळे प्रभावित होत आम्हाला तेलंगणात समाविष्ट करा, अशी मागणी करत तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांची भेट घेतली होती. त्याची दखल घेत महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भागातील सरपंचांना मुंबईत पाचारण केले होते. त्यांच्या समस्या ऐकून घेत ४० कोटींचा निधीही देण्याची घोषणा केली होती. परंतु या घोषणा हवेतच विरल्या. त्यामुळे सीमावर्ती भागातील जनतेचे प्रश्न आजही जशास तसे आहेत.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सीमावर्ती भागातील गावांना अजूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने जनतेचा हा आक्रोश असल्याचेही या बैठकीचे आयोजक शंकर पाटील होट्टे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील वाढता भ्रष्टाचार, रस्त्याची दूरवस्था, पाण्याचे टंचाई या सर्व गोष्टींपेक्षा तेलंगणा सरकारच्या योजना किती प्रभावशाली आहेत आणि प्रांत रचना होण्याच्या अगोदर हा संपूर्ण परिसर निजामकालीन हैदराबाद राज्यामध्ये होता. त्यापूर्वी मुधोळ हा आपला तालुका होता.

कदाचित आपण तेलंगणात राहिलो असतो तर ‘सुजलाम् सुफलाम्’ झालो असतो व राज्य शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभार्थी ही झालो असतो, असेही होट्टे यांनी सर्व सरपंचांना संबोधित करताना सांगितले. या बैठकीला तेलंगणा राष्ट्र समितीचे बासर मंडळ प्रमुख व अध्यक्ष शाम कोरवा, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा समन्वय साधणारे मलकापूर लिंगा रेड्डी (चिन्ना दोरा), बासरचे ज्येष्ठ कार्यकर्ते कोरवा सदानंद अण्णा, माजी नगरसेवक रवींद्र शेट्टी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष निदानकर, सामाजिक कार्यकर्ते जी. पी. मिसाळे उपस्थित होते.

तेलंगणा सरकारच्या विविध योजनांची माहिती बासर मंडळाचे प्रमुख शाम कोरवा यांनी दिली. यावेळी अनेक सरपंचांनी आपले मनोगत व्यक्त केले व विविध विकास कामापासून आपण कसे वंचित आहोत व तेलंगणा सरकारच्या योजना किती प्रभावशाली आहेत हाच सूर लावला. शेवटी सर्वांनी एकमताने आपले विचार मांडून भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या अंतर्गत आपण काम करायचे व आगामी सर्व निवडणुका या पक्षाच्या चिन्हावरच लढवायच्या असे ठरवले.

टी.आर.एस.पार्टीचे आगमन महाराष्ट्रात लवकरच होणार असून या संदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हैदराबादमध्ये बैठक घेतली आहे. तेलंगणातील सोयी सुविधा, जनता व शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले क्रांतिकारक निर्णय, विविध योजनांची माहिती तेलंगणा राष्ट्र समितीचे आमदार, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याला भेट देऊन पटवून सांगणार असल्याचे शाम कोरवा यांनी सांगितले. टी. आर. एस पार्टीचे आगमन महाराष्ट्रात झाल्यास भाजपचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.