देश बातमी

अर्थव्यवस्थेसाठी आणखी कठीण काळ; मनमोहन सिंग यांनी केली ही सूचना

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी १९९१ पेक्षा कठीण काळ येणार असल्याचे म्हटले आहे. माजी पंतप्रधान आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी १९९१च्या ऐतिहासिक अर्थसंकल्पाला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सध्याच्या अर्थव्यवस्थेबाबत भाष्य केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाच्या साथीमुळे उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता पुढचा रस्ता १९९१पेक्षा अधिक आव्हानात्मक आहे आणि अशा परिस्थितीत भारताला आपला प्राधान्यक्रम पुन्हा निश्चित करावा लागेल अशी सूचना मनमहोन सिंग यांनी केली आहे. मनमोहन सिंग हे १९९१ मध्ये नरसिंग राव यांच्या नेतृत्वात सरकारचे अर्थमंत्री होते आणि त्यांनी २४ जुलै १९९१ रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. हा अर्थसंकल्प हा देशातील आर्थिक उदारीकरणाचा पाया मानला जातो. तो अर्थसंकल्प सादर करुण ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रसंगी ते म्हणाले, ३० वर्षांपूर्वी १९९१ मध्ये काँग्रेस पक्षाने भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या आणि देशाच्या आर्थिक धोरणाला नवा मार्ग दिला होता. गेल्या तीन दशकांत विविध सरकारांनी या मार्गाचा अवलंब केला आहे आणि देशाची अर्थव्यवस्था तीन हजार अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे आणि ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, असे सिंग म्हणाले.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे या काळात सुमारे ३० कोटी भारतीय नागरिक दारिद्र्यातून मुक्त झाले आणि कोट्यावधी नवीन रोजगार निर्माण झाले. सुधारणांची प्रक्रिया जसजशी प्रगत होत गेली, तसे स्वतंत्र उद्योजकतेची भावना निर्माण झाली यामुळे बर्‍याच जागतिक स्तरावरील कंपन्या देशात अस्तित्वात आल्या आणि भारत बर्‍याच क्षेत्रांमध्ये जागतिक शक्ती म्हणून उदयास आला. १९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणाची सुरुवात आपल्या देशाला व्यापलेल्या आर्थिक संकटामुळेच झाली. हे संकट व्यवस्थापनापुरते मर्यादित नव्हते. समृद्धीची इच्छा, स्वतःच्या क्षमतेवरील आत्मविश्वास आणि अर्थव्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण सोडण्यामुळेच भारताच्या आर्थिक सुधारणेचा पाया रचला गेला, असे मनमोहन सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

मी भाग्यवान आहे की मला काँग्रेसमधील अनेक सहकाऱ्यांसह सुधारणांच्या या प्रक्रियेत माझी भूमिका पार पाडता आली. गेल्या तीन दशकात आपल्या देशाने जबरदस्त आर्थिक प्रगती केली आहे याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. पण कोविडमुळे झालेला विध्वंस आणि कोट्यवधी लोकांनी नोकरी गमावल्यामुळे मी दु:खी आहे. आरोग्य आणि शिक्षण ही क्षेत्रे मागे पडली आहेत आणि आपल्या आर्थिक प्रगतीच्या गतीने ते पुढे आली नाहीत. १९९१ च्या संकटाच्या तुलनेत आताचा पुढचा रस्ता अधिक आव्हानात्मक आहे. एक देश म्हणून आपल्याला आपला प्राधान्यक्रम पुन्हा एकदा निश्चित करण्याची गरज आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला आरोग्य आणि सन्मानजनक जीवन जगात येईल, असेही मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *