महाराष्ट्रातील केंद्रिय मंत्र्यांच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या पाच पोलीसांचे निलंबन
बातमी मराठवाडा

महाराष्ट्रातील केंद्रिय मंत्र्यांच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या पाच पोलीसांचे निलंबन

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील जाफ्राबाद येथील कार्यालयाची झाडाझडती घेणाऱ्या पाच पोलीसांचे निलंबन करण्यात आले आहे. कोणतेही वॉरंट नसताना बेकायदेशीरपणे ही झाडाझडती घेण्यात आल्याने कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये दोन पोलीस उप-निरीक्षकांचा समावेश आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ही कारवाई केली आहे. ११ जून रोजी ही जाफ्राबाद येथे ही झाडाझडती घेण्यात आली होती. दानवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी ११जूनला वॉरंट नसतानाही आणि कोणतीही परवानगी न घेता जाफ्राबादमधील कार्यालयाची झडती घेतली. तसंच यावेळी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

रावसाहेब दानवे यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. चौकशीदरम्यान पोलिसांनी बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलीस अधिक्षकांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये उपनिरीक्षक युवराज पोठरे, नितीन काकरवाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग सोळंके तसंच कॉन्स्टेबल शाबान तडवी आणि सचिन तिडके यांचा समावेश आहे.