कोरोना लस बनवत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग; पाच जणांचा मृत्यू
पुणे बातमी

कोरोना लस बनवत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग; पाच जणांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील कोरोना लस बनवत असेलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या आवारातील इमारतीत आग लागल्याची घटना घडली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले बांधकाम मजूर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त करण्यात आली आहे. आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरु होतं. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुरुवातीला चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आग १०० टक्के विझल्यानंतर आपली लोकं शेवटच्या मजल्यावर पोहोचली तेव्हा मजला खाक झाला होता आणि पाच जणांचे मृतदेह पडले होते. पाचही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार वेल्डिंगचं काम सुरु असताना दुपारी २ वाजता आग लागली. वेल्डिंगचं निमित्त होतं मात्र तेथील ज्वलनशील सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. महापालिकेचे पाच टँकर आणि तीन पाण्याचे टँकर तात्काळ बोलावण्यात आले होते. संपूर्ण आग विझवण्यात आली असून दोन ते तीन तास लागले. संपूर्ण आग विझल्यानंतर आत जाऊन पाहिलं असता पाच मृतदेह सापडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

राजेश टोपे यांनी यावेळी कोव्हिशिल्ड लसीला कोणताही फटका बसला नसल्याचं यावेळी सांगितलं. दरम्यान याप्रकरणी पोलीस चौकशी करत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. पोलीस तपासासोबत फायर ऑडिटही केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.