म्युकरमायकोसिसचा वाढला धोका; शिर्डीत अवघ्या ५ महिन्यांच्या चिमुकलीला लागण
पश्चिम महाराष्ट्र बातमी

म्युकरमायकोसिसचा वाढला धोका; शिर्डीत अवघ्या ५ महिन्यांच्या चिमुकलीला लागण

अहमदनगर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट अनेक ठिकाणी ओसरत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिर्डीत अवघ्या पाच महिन्यांच्या बालिकेला आधी कोरोना होऊन आता म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. तिच्यावर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इतक्या लहान मुलीला म्युकरमायकोसिस झाल्याने आरोग्य यंत्रणेला धक्का बसला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत वास्तव्यास आहे. त्यांची परिस्थिती सामान्य आहे. त्यांना दोन मुली आहेत. त्यातील धाकटी मुलगी पाच महिन्यांची आहे. मे महिन्यात २७ तारखेला या मुलीला जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत होता. सुरुवातीला तिला कोपरगाव येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला दाखल करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार उपचार सुरू झाले. मात्र, काही फरक पडत नव्हता. त्यामुळे तिला नाशिक येथे हलविण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तेथे तिची करोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. मात्र, रक्त तपासणी केली असता तिच्यामध्ये अँटीबॉडिज तयार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला लक्षणे विरहित कोरोना होऊन गेल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

त्यानुसार उपचार सुरू करण्यात आले. तरीही तिला फरक पडत नव्हता. नंतर तिचा चेहरा, डोळे आणि अंगावर सूज आल्याचे आढळून आले. ही म्युकरमायकोसिसची लक्षणे असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यानुसार उपचार करण्याचा सल्ला दिला. आतापर्यंत त्यांनी नातेवाईकांकडून पैसे घेऊन उपचारांचा खर्च भागविला. पैसे संपल्याने नाशिकमध्ये उपचार घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रवरानगर येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. रविवारी १३ जूनला या मुलीला प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. तेथे बालरोग विभागात डॉ. संजीव यांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. आता या मुलीला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.