कोरोनाची तीव्रता कमी होतेय; पण मृत्यूचे तांडव कधी थांबणार?
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाची तीव्रता कमी होतेय; पण मृत्यूचे तांडव कधी थांबणार?

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत असला तरी मृत्यूचे तांडव मात्र सुरुच आहे. त्यामुळे देशातील मृत्यूचे तांडव कधी संपणार हा प्रश्न उर्वरित राहतो. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, कोरोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या सातत्याने अधिक आढळून येत आहे. देशातील रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ सुरू आहे. मात्र असे जरी असले तरी अद्यापही कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच असल्याने काहीशी चिंता कायम आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २४ तासात देशभरात १ लाख ३२ हजार ०६२ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ८० हजार ८३४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, ३ हजार ३०३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ९४ लाख ३९ हजार ९८९ झाली असून, आजपर्यंत २ कोटी ८० हजार ४३ हजार ४४६ रूग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. तर, देशभरात आजपर्यंत ३ लाख ७० हजार ३८४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव्ह रूग्ण संख्या १० लाख २६ हजार १५९ आहे.

लसीकरणाला वेग
देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत आजपर्यंत २५ कोटी ३१ लाख ९५ हजार ०४८ लोकांचे लसीकरण झालेले आहे. तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १२ जून पर्यंत ३७ कोटी ८१ लाख ३२ हजार ४७४ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी १९ हजार ३१२ नमुन्यांची मागील २४ तासांत तपासणी झालेली आहे.