स्निफर डॉग’ची कमाल आणि सापडला बलात्कार प्रकरणाचा आरोपी
बातमी महाराष्ट्र

स्निफर डॉग’ची कमाल आणि सापडला बलात्कार प्रकरणाचा आरोपी

पालघर : रात्रीच्या वेळी आईजवळ झोपलेल्या तीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या स्निफर डॉग’च्या मदतीने तलासरी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशयित आरोपीला दारूचे व्यसन असून त्याने यापूर्वीही गावात रोजंदारीवर आणि फॅक्टरीत काम करणाऱ्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नीदेखील त्याला सोडून गेली. मात्र १ जानेवारी रोजी मुलीला तिच्या झोपडीतून पळवून नेल्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिला भाताच्या शेतात टाकून तो त्याच्या झोपडीकडे पसार झाला. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), कलम 363 (अपहरण) आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारीच्या रात्री तलासरी येथे ३ वर्षीय बालिका आपल्या आईसोबत घरासमोरच्या अंगणात झोपली होती. त्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास रोजंदारी काम करणाऱ्या एका ३८ वर्षीय इसमाने तिला आईजवळून उचलून नेलं. आरोपी मुलीला घेऊन जात असतानाच आई उठली व जोरात ओरडली. आईने पती आणि अन्य शेजाऱ्यांसह आरोपीचा पाठलाग केला पण अंधाराचा फायदा उचलत तो बालिकेला घेऊन फरार झाला. घरापासून काही अंतरावर भाताच्या शेतात ही मुलगी वेदनेने विव्हळताना सापडली. त्यानंतर आई-वडिलांनी तिला रुग्णालयात नेले आणि अज्ञात व्यक्तीने मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रारही पोलिस स्थानकात केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यांना घटनास्थळावरुन चपलांचा जोड मिळाला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. मात्र बालिकेच्या आईला तिघांपैकी नेमका आरोपी कोण हे समजत नव्हतं. टाइम्स नाउच्या वृत्तानुसार, अखेर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकातील एका स्निफर डॉगला घटनास्थळी सापडलेल्या चपलांचा वास दिला. त्यानंतर हा स्नीफर डॉग थेट आरोपी राहत असलेल्या झोपडीत पोहोचला आणि आरोपी सापडला.