विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून गायकवाड कुटुंबियांचा कौतुकास्पद उपक्रम
बातमी मराठवाडा

विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून गायकवाड कुटुंबियांचा कौतुकास्पद उपक्रम

नांदेड : विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून नांदेड येथिल गायकवाड कुटुंबियांनी एक कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. नांदेडमधील बुद्धिस्ट असोशिएशनला गायकवाड कुटुंबियांकडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोफत देण्यात आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्याचा हा काळ सर्वांसाठी संकटकाळ असून अशा कठीण काळात प्रत्येकांनी एकमेकांची मदत करणे आवश्यक आहे. या हेतूने महाराष्ट्र राज्याचे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी नुकतेच कोरोना आणि दान पारमिताला अनुसरून सर्वांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मदतीसाठी पुढे येण्याचे समाजमाध्यमातून आवाहन केले होते. डॉ. कांबळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेड येथील पत्रकार जयपाल गायकवाड यांनी पुढाकार घेत आपल्या विवाह सोहळ्यात कोरोना काळात उपयोगी येतील असे सुमारे दीड लाख किमतीचे दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नांदेड बुद्धिस्ट असोशिएशनला मोफत दिले आहेत.

जयपाल गायकवाड यांचा रविवारी (ता. ११) संबोधी चिखलीकर यांच्याशी विवाह झाला. आपण कोरोनाच्या काळात अनेक जवळच्या माणसांना गमावले आहे, ही संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाची हानी तर आहेच पण समाजाचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय साधने व सुविधा उपलब्ध करून देणे ही खूप आवश्यक बाब बनली आहे. कोरोना काळात सामूहिकपणे गरजूंना मदत केली पाहिजे या हेतूने डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकार जयपाल आणि संबोधी यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोफत म्हणून दिले आहेत. पत्रकार जयपाल आणि संबोधी यांनी संकटकाळात समाज उपयोगी दान पारमिता ही सर्वांनासाठी आदर्श घेण्यासारखी असल्याची चर्चा सध्या होत आहे.

दरम्यान, डॉ. कांबळे यांनी कोरोना महामारीच्या आरंभ काळात राज्यात २५००० गरजुंना अन्नधान्याचे किट्स वाटप केले होते. तसेच मूळच्या थायलंड येथील उपासिका असणाऱ्या डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या पत्नी रोजाना व्हॅनीच कांबळे यांच्याकडून भारताला २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत. त्यासोबतच नुकत्याच ३१ ऍम्ब्युलन्स सुद्धा भारताला मिळाल्या आहेत. इतके मोठे दान आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहचवण्याचं डॉ. कांबळे यांच्या माध्यमातून होत असताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही मदत केली असल्याचे जयपाल गायकवाड यांनी सांगितले. त्याचबरोबर, कोरोनाच्या संकटकाळात समाजातील स्वतः बुद्धिष्ट समजणाऱ्या, इतरांपेक्षा ज्यांचे जीवनमान चांगल्या स्थितीत आहे अशांच्या आचरणामध्ये करूणेची, दान पारमितेची जी कमतरता दिसून आली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून डॉ. हर्षदीप कांबळे यांनी जेव्हा समाजाला गरज आहे तेव्हा आपणच पुढे यायला पाहिजे असे आवाहन केले असून आपण त्याचेच आचरण करत असल्याचेही गायकवाड म्हणाले.