पुण्यानंतर मुंबईतही अ‍ॅमेझॉनच्या गोदामाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
बातमी मुंबई

पुण्यानंतर मुंबईतही अ‍ॅमेझॉनच्या गोदामाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

मुंबई : पुण्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या आणखी एका गोदामाची तोडफोड केली आहे. मुंबईच्या चांदिवली परिसरात असणाऱ्या या अ‍ॅमेझॉनच्या गोदामाला मनसैनिकांनी ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. अमेझॉनवर मराठी भाषेचा वापर करण्यासाठी मनसेने अमेझॉनकडे मागणी केली होती. मात्र त्यानंतर अमेझॉनने कोर्टात धाव घेतल्याने मनसे विरुद्ध अमेझॉन वाद चांगलाच पेटला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या महितीनुसार, अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अ‍ॅमेझॉनविरोधात फलक लावले होते. मराठी भाषेवरुन सुरु केलेल्या मोहिमेवरुन अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काही नेत्यांना पाच जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने पाठवलेल्या नोटिशीमुळे आता मनसैनिक प्रचंड संतापले असून त्यांनी त्यांनी मुंबईतील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. या मनसैनिकांनी चांदीवलीतील साकीविहार येथील मारवे रोडवर असलेल्या अमेझॉनच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली. हे सर्व मनसैनिक चांदीवली मतदार संघातील आहेत.

दरम्यान, “अ‍ॅमेझॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीने एका चांगल्या लीगल फर्मला अपॉईंट करणं अपेक्षित होतं. पण एखाद्या मूर्ख वकिलाकडून त्यांनी ते लेटर ड्राफ्ट केलं आहे. त्यांनी जी नोटीस पाठवली आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची किंमत नक्कीच ॲमेझॉनला येत्या काळात मोजावी लागेल, असा इशारा मनसेच्या अखिल चित्रे यांनी दिला होता.

तर आज सकाळीच पुण्याच्या कोंढवा परिसरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतर आता मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे आता हे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे मनसे विरुद्ध अ‍ॅमेझॉनहा वाद आणखीनच चिघळला आहे.

अ‌ॅमेझॉनने मराठी भाषेचा समावेश केल्यास मराठी लोकांना व्यवहार करणे सोपे होईल आणि ते संकेतस्थळावरुन आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अ‌ॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अ‌ॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेण्यात आली होती. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्या मालाची डिलिव्हरी होऊन देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे.