लस पुरवठ्यानंतर हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी मानले भारताचे आभार
बातमी विदेश

लस पुरवठ्यानंतर हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी मानले भारताचे आभार

संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना महामारीचे संकट अद्यापही कायम आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लसीकरणाला सुरवात केली आहे. भारतातही आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं मदतीसाठी हात पुढे केला होता.त्यानंतर भारतानेही ब्राझीलला गुरुवारी लसीचा पुरवठा केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विशेष बाब म्हणजे ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत. “जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल आभार,” असं म्हणत बोलसोनारो यांनी म्हटलं आहे.

तर बोलसोनरो यांच्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिसाद दिला आहे. “बोलसोनारोजी, कोविड महामारीविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणं हा आमचा सन्मान आहे. आरोग्यसेवांवरील आपलं सहकार्य भारत बळकट करत राहिलं,” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर ब्राझीलनं लसीची मागणी केली होती. याबाबत बोलसोनारो यांनी तसं पत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं होतं. ब्राझीलकडून करण्यात आलेल्या मदतीच्या मागणीला भारतानं सकारात्मक प्रतिसाद देत लस पुरवण्यास सुरूवात केली.

दरम्यान, बोलसोनरो यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले होते की, ” भारतात कोविशिल्ड ही लस नावाने बाजारात आणली गेली आहे. ब्राझीलमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम तातडीने सुरू करण्यासाठी भारतातील लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कोविड लसीचे २० लाख डोस तातडीने पाठवावे,” असं बोलसोनारो यांनी पत्रात म्हटलं होतं.