पुणेकरांसाठी खूशखबर ! उद्यापासून ७ ते २ सर्व दुकाने सुरु राहणार
पुणे बातमी

पुणेकरांसाठी खूशखबर ! उद्यापासून ७ ते २ सर्व दुकाने सुरु राहणार

पुणे : राज्यातील कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला असून त्या पार्श्वभूमीवर निर्बंधासंबंधी राज्याने ज्या त्या स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार दिल्यानंतर पुणे महापालिकेने उद्यापासून दुकाने सकाळी ७ ते २ चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवारी ते शुक्रवारी सुरू राहतील. तर, शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. याशिवाय, शहरातील उद्यानं, व्यामशाळा(जिम), हॉटेल बंद राहणार असून, पार्सल सुरू राहणार आहे.

पुढील दहा दिवसांसाठी हा आदेश असणार आहे. आता २ वाजेपर्यंत नागरिकांच्या दृष्टीने सर्व सेवा सुरू राहणार आहेत. पण त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये. पीएमपीएमएल बस सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍यांसाठी सुरू राहणार आहे, इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही, अशी देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.