अमेरिकेत कोरोनाचा कहर ! एका दिवसात ४ लाख रुग्णांची नोंद
बातमी विदेश

अमेरिकेत कोरोनाचा कहर ! एका दिवसात ४ लाख रुग्णांची नोंद

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. अमेरिकेत कोरोनाची त्सुनामी आली असून एका दिवसात अमेरिकेत तब्बल ४ लाख कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेतील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे हे धडकी भरवणारे आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीएस) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ४ लाख ३ हजार ३५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी ११ डिसेंबर रोजी अमेरिकेत एका दिवसातील आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. ११ डिसेंबरला अमेरिकेत २ लाख ४४ हजार ११ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आजचा आकडा हा खूपच भयंकर आहे.

गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्यांची संख्या २,७५६ इतकी असल्याचं सीडीएसने जाहीर केलं आहे. जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेतच आढळून येत आहेत. आतापर्यंत १.७६ कोटींहून अधिक रुग्णांची अमेरिकेत नोंद झाली आहे. तर ३ लाख १५ हजार ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे अमेरिकेत कोरोनावरील लस देण्याचं कामही सुरु झालं आहे. पण, त्याचवेळी संक्रमणाचंही प्रमाण वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरं जात असलेल्या अमेरिकेत ४ नोव्हेंबरपासून दररोज १ लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कॅलिफोर्निया, टेक्सास आणि फ्लोरिडामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.