राज्यातील आणखी एक जिल्हा मध्यवर्ती बँक ईडीच्या रडारवर
बातमी विदर्भ

राज्यातील आणखी एक जिल्हा मध्यवर्ती बँक ईडीच्या रडारवर

अमरावती : राज्यातील आणखी एक जिल्हा मध्यवर्ती बँक आता ईडीच्या रडारवर आली आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे ईडीने दखल घेत बँकेला नोटीस बजावली असल्याची माहिती समोर येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सक्तवसुली संचालनाच्या अर्थात ईडीच्या रडारवर बँक आली आहे. ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागितली असून जिल्हा उपनिबंधकाना ईडीने पत्र पाठवत विनाविलंब मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिषण अहवाल पाठविण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहे.

अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, यात दलालीपोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असतांना दलाली देणे बंधनकारक नव्हते, त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 15 जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व सहा दलाल अशा एकूण 11 जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता यात थेट ईडीने दखल घेतल्याने खळबळ उडाली आहे.