डॉ. शीतल आमटे यांच्यानंतर कुटुंबियातील व्यक्तीने दिली पहिली प्रतिक्रिया
बातमी विदर्भ

डॉ. शीतल आमटे यांच्यानंतर कुटुंबियातील व्यक्तीने दिली पहिली प्रतिक्रिया

चंद्रपूर : डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळं राज्यातील सामाजिक वर्तुळ हादरून गेलं आहे. या घटनेबद्दल आमटे कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिगंत फार काही बोलले नाहीत. ‘आमच्यासाठी हे सगळं अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण शॉकमध्ये आहोत. सध्या काहीही सांगण्याच्या मन:स्थितीत नाही, इतकंच बोलून, हात जोडून दिगंत आमटे निघून गेले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉ. शीतल आमटे या आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. आनंदवन प्रकल्पातच त्या वास्तव्यास होत्या. गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती आमटे कुटुंबीयांनी नुकतीच दिली होती. या वादावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे हे हेमलकसा प्रकल्पात गेले होते. त्यावेळी शीतल या आपल्या खोलीत एकट्याच होत्या. त्यांची प्रकृती बिघडल्याची बाब सासरे आणि पती गौतम यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर तेथील डॉक्टरांनी डॉ. शीतल यांना मृत घोषित केले.

शीतल यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. शीतल यांचे पार्थिव काल संध्याकाळी आनंदवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. आमटे कुटुंबातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.