‘मॅन ऑफ द होल’चा अंत; जगातील सर्वात एकट्या माणसाचा मृत्यू; निधनानं समुदाय संपला
देश बातमी

‘मॅन ऑफ द होल’चा अंत; जगातील सर्वात एकट्या माणसाचा मृत्यू; निधनानं समुदाय संपला

रिओ डी जनेरो: ब्राझीलचे मूळ निवासी असलेल्या समुदायातील शेवटच्या सदस्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दुर्गम भागात राहणारा हा समुदाय संपला आहे. समुदायातील शेवटच्या व्यक्तीचा कधीही बाहेरच्या जगाशी संपर्क आलेला नव्हता. तो अनेक वर्षांपासून जंगलात एकटाच राहायचा. ब्राझीलची इंडिजीनियस प्रोटेक्शन एजन्सी फुनाईनं या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार, ही व्यक्ती मॅन ऑफ द होल नावानं ओळखली जायची. गेल्या २६ वर्षांपासून ती व्यक्ती तनारुमध्ये वास्तव्यास होती. हा भाग ब्राझीलच्या रोंडोनिया राज्यात असलेल्या ऍमेझॉनच्या जंगलात आहे. मृत पावलेला व्यक्ती आवा समुदायाचा सदस्य होता. आवा समुदाय ब्राझीलचे मूळ निवासी मानले जातात. ते ऍमेझॉनच्या जंगलात वास्तव्यास होते. मॅन ऑफ द होलच्या निधनामुळे आवा समुदाय संपुष्टात आला आहे.

आवा समुदायातील शेवटच्या व्यक्तीला मॅन ऑफ द होल नाव देण्यामागील कथादेखील रंजक आहे. हा व्यक्ती अतिशय खोल खड्डे पाडायचा. जनावरांना अडकवण्यासाठी, त्यांची शिकार करण्यासाठी या खड्ड्यांचा वापर करायचा. याच खड्ड्यांमध्ये तो लपायचा. स्थानिक अधिकाऱ्यांनी या व्यक्तीशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र त्यानं या प्रयत्नांना कधीच प्रतिसाद दिला नाही. अनेकदा त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा, त्या टिपण्याचा प्रयत्न झाला. बऱ्याचदा त्याला अत्यावश्यक सामानदेखील देण्यात आलं.

आवा समुदायातील अन्य सदस्य ७० च्या दशकात विविध हल्ल्यांमध्ये मारले गेले. पशुपालन करणाऱ्यांनी आणि जमीन माफियांनी अनेकदा आवा समुदायालवर हल्ले केले. त्यामुळे त्यांची संख्या कमी होत गेली. आवा समुदायातील शेवटच्या व्यक्तीचं नाव काय होतं याची माहिती कोणालाच नाही. २३ ऑगस्टला फुनाईच्या अधिकाऱ्यांना त्याचा मृतदेह एका झोपडीत सापडला. त्याच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. आसपास हल्ल्याच्या कोणत्याही खुणा नाहीत. त्यामुळे त्याचं निधन नैसर्गिक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.