बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
बातमी मुंबई

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आज (ता. ३१) संध्याकाळी ५.३० वाजता भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतले तीन प्रमुख नेते उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या सोहळ्यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा विधी पार पडला. त्यानंतर त्यांच्या हस्ते स्मारकाच्या आवारातच वृक्षारोपण केलं गेलं. त्यानंतर महाविकास आघाडीतील दुसरा प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. आणि सरतेशेवटी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आलं. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिनही प्रमुख पक्षांच्या राज्यातील प्रमुख नेत्यांचा या सोहळ्यामध्ये सहभाग होता.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हा सरकारी कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रित केलं जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसं झालं नाही. मनसे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे यांना देखील कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. मुंबईतील जुन्या महापौर निवासस्थानाची वास्तू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी अंतिम करण्यात आली असून तिथे बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारलं जाणार आहे. त्यासाठी आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.