देश बातमी

प्रदेशाध्यक्ष पदाची निवड लांबत चालल्याने बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

मुंबई : जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो तातडीने घ्या, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. मात्र, अजूनही अधिकृतपणे एकही नाव समोर आलेलं नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘एकंदर वर्षभरात काय काय कामं झाली. पुढचं वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे, या निवडणुकीत पक्ष कसा सामोरा जाईल याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे. फार काळ हे चालणे योग्य नाही, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी तातडीने घ्यावा असं आमचं मत आहे. श्रेष्ठींना वाटत असेल प्रदेशाध्यक्ष वेगळा असावा, एकाच व्यक्तीकडे दोन्ही जबाबदारी नको तर तशी संधी एखाद्या तरुण नेतृत्वाला द्यावी. काहीही वाटत असलं तरी शेवटी निर्णय घेणारे श्रेष्ठ आहेत. असंही थोरात यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ‘दोन दिवस मुंबईत मंत्री, आमदारांसोबत मंथन करुन दिल्लीत पोहोचलेले महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील हे दिल्लीत कुठल्याही महत्त्वाच्या बैठकीविनाच कर्नाटकमध्ये परतले. दिल्लीत संघटन महासचिव के सी वेणुगोपाल यांच्यासोबत त्यांची बैठक अपेक्षित होती, ती बैठक न होताच एच के पाटील हे कर्नाटकला परतले. एच के पाटील यांची प्रकृती काहीशी ठीक नसल्याचंही सांगितलं जात होतं.

तर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले यांचं नाव सध्या आघाडीवर आहे, पण बदलाबाबतचा अंतिम निर्णय राहुल गांधी मायदेशी परतल्यावरच होणार आहे. तर एका पक्षाचे सरकार असलं तरीसुद्धा अंतर्गत प्रश्न असतात इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. कमी कालखंडात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. पक्षाला सत्तेत सहभागाचे मंत्रिमंडळ बनलं, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्याचं थोरात यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published.