मोठी बातमी : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत्यूचे तांडव; उष्माघाताने घेतला ११ जणांचा बळी
बातमी मुंबई

मोठी बातमी : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत्यूचे तांडव; उष्माघाताने घेतला ११ जणांचा बळी

नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ऐन उन्हाळ्यात २० लाखांचा जनसमुदाय एकत्रित आणणे सरकारच्या चांगलेच अंगलट आले आहे. रखरखत्या उन्हात खारघर येथील मैदानावर पाच तास बसावे लागल्यामुळे शेकडो श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवला. अखेर उष्माघाताचा त्रास सहन न झाल्याने ११ श्री सदस्यांचा नाहक बळी गेला आहे. तर नवी मुंबई पनवेल परिसरातील विविध रुग्णालयात उष्माघातामुळे उपचारार्थ दाखल झालेल्या अन्य ४० श्री सदस्यांपैकी चार ते पाच श्री सदस्य अत्यवस्थ आहेत. त्यामुळे न भूतो न भविष्यती असा ठरू पाहणाऱ्या या कार्यक्रमात मृत्यूने तांडव घातल्याचे दिसून आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी खारघर येथे आले होते. आपल्या गुरुला सन्मानित करताना याची देही याची डोळा पाहण्यासाठी तब्बल २० लाख श्री सदस्यांची उपस्थिती असल्याचे बोलले जाते. त्या अनुषंगाने शासन यंत्रणेने आयोजनाची सर्व तयारी पूर्ण केली होती. परंतु कार्यक्रमात भर उन्हात श्री सदस्यांना तब्बल सहा-तास बसवून ठेवले. परिणामी कार्यक्रम सुरू असताना ॲम्ब्युलन्सचे सायरन एका मागोमाग वाजू लागले होते. उष्माघाताच्या त्रासामुळे अनेक श्री सदस्य बेशुद्ध होऊ लागले होते. त्यात कार्यक्रम संपण्यास दुपारचे दीड वाजले. त्यानंतर एवढा मोठा जनसमुदाय खारघर परिसरातून बाहेर पडण्यास पुढचे दीड -दोन तास लागले.

उपस्थित जनसामुदायाला प्यायला पाणी कमी पडल्याने अनेकांना जागोजागी भोवळ येत होती. त्यात बस स्थानक, रेल्वे स्थानकाकडे चालत जाणे देखील श्री सदस्यांना कठीण झाले होते. जी सार्वजनिक वाहने श्री सदस्यांना नेण्यासाठी ठेवण्यात आली होती, ती वाहने बराच वेळ ट्रॅफिक मध्ये अडकून पडल्याने अनेक श्री सदस्यांना भर उन्हात तीन चार किलोमीटर चालणे भाग पडले.

उष्माघातामुळे त्रास असह्य झाल्यामुळे वाशी येथील महापालिका रुग्णालय, कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय, खारघर येथील मेडीकोव्हर रुग्णालय व खारघर येथील टाटाच्या ॲट्रॅक्ट रुग्णालयात जवळपास ३८ ते ४० श्री सदस्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यापैकी अनेक रुग्ण अत्यवस्थ झाले होते. तर काही श्री सदस्य जागेवरच गतप्राण झाले. रविवारी रात्री उशिरापर्यंत अकरा श्री सदस्यांचा नाहक बळी गेल्याची माहिती सरकारी यंत्रणांनी दिली. तर उपचार घेणारे आणखीन चार-पाच श्री सदस्य अत्यवस्थ असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाला घोर लागला आहे.

मृत पावलेल्या रुग्णांची माहिती सांगण्यास यंत्रणांकडून टाळाटाळ होऊ लागल्याने अनेक नातेवाईक संभ्रमात पडले होते‌. त्यांना कुठल्याच प्रकारची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे मृतांचा नक्की आकडा किती हे रात्री उशिरापर्यंत यंत्रणांनी स्पष्ट केले नाही. वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात एकूण नऊ रुग्ण दाखल असून त्यापैकी आठ जणांची तब्येत व्यवस्थित आहे. मात्र एक जण अत्त्यवस्थ असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. अत्यवस्थ असलेल्या त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर उष्माघाताचे उर्वरित रुग्ण हे पनवेल परिसरातील अन्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत.

दरम्यान, रात्री उशिरा ११ मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रत्येक मृतदेहासोबत एक माणूस व गाडी शासनातर्फे देण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या त्यांच्या गावी त्यांचे नातेवाईक घेऊन जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.

बातमी साभार : महाराष्ट टाइम्स