धक्कादायक! भाजप नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या
देश बातमी

धक्कादायक! भाजप नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे आहे. नगरसेवक असणारे राकेश पंडिता त्राल परिसरातील आपल्या मित्राच्या घरी असताना दहशतवादी घरात घुसले आणि गोळीबार केला अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राकेश पंडिता यांचा गोळीबारानंतर जागीच मृत्यू झाला तर गोळीबारात आसिफा मुश्ताक नावाची एक महिला जखमी झाली आहे. महिलेवर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश पंडिता यांना सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा अधिकारी पुरवण्यात आले होते. तसंच त्यांना श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र त्राल येथे जाताना ते सुरक्षा सोबत घेऊन गेले नव्हते.

काश्मीर पोलिसांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी राकेश पंडिता सुरक्षेविनाच त्राल येथे गेल्याचं सांगितलं आहे. दरम्यान घटनेनंतर परिसर सील करण्यात आला असून शोध सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राकेश पंडिता २०१८ मध्ये महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आले होते. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसारख्या मोठ्या पक्षांकडून यावेळी स्थानिक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता.