धक्कादायक ! बिहारनंतर यूपीमध्ये नदीत तरंगताना आढळले मृतदेह
देश बातमी

धक्कादायक ! बिहारनंतर यूपीमध्ये नदीत तरंगताना आढळले मृतदेह

लखनौ : बिहारच्या बक्सरमध्ये चौथा शहरात गंगा नदीच्या किनाऱ्यावर सुमारे १०० मृतदेह आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश मधून वाहून आल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील गाझीपुरातील गंगेच्या काठी मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हे मृतदेह कोरोनाबाधितांचे असल्याची शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गाझीपूरमधील गंगेच्या किनाऱ्यावर काही मृतदेह आढळले. गाझीपूर ते बक्सर दरम्यान सुमारे 55 किलोमीटर अंतर आहे. यापुर्वी बक्सरमध्ये सोमवारी सुमारे १०० मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले होते. त्यानंतर हे मृतदेह उत्तर प्रदेशातून आले असल्याचे बिहारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर भारतातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे हे कोविड रुग्णांचे मृतदेह असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

उत्तर प्रदेश मध्ये करोना रुग्णांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी मृतदेह नदीत सोडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतदेह नदीत सोडल्याने दूषित पाण्यामुळे करोना संक्रमण अधिक वेगाने पसरण्याची भीती स्थानिकांना आहे. या प्रकरणाची अधिकारी चौकशी करत आहेत.