प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे 77व्या वर्षी निधन
देश बातमी

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे 77व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे गुरुवारी सकाळी वयाच्या ७७व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते असलेल्या दासगुप्ता यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत. कोलकाता कालिकापूर भागात असलेल्या निवासस्थानी दासगुप्ता हे सकाळी ६ वाजता निश्चल अवस्थेत असल्याचे त्यांच्या पत्नी सोहिनी यांना आढळले. त्यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन गेला, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुरुलिया येथे १९४४ साली जन्म झालेले दासगुप्ता यांनी एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. कलकत्ता फिल्म सोसायटीचे सदस्य म्हणून नाव नोंदवल्यानंतर १९७०च्या दशकात ते चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात उतरले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, चित्रपट निर्माते गौतम घोष, अभिनेत्या- दिग्दर्शक अपर्णा सेन, रंगभूमीवरील अभिनेते कौशिक सेन यांनी दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

१९७८ सालचा दूरत्व हा त्यांचा पहिला चित्रपट होता. नीम अन्नपूर्णा, गृहयुद्ध, बाघ बहादूर, चराचर, लाल दर्जा, स्वप्नेर दिन, उत्तरा व कालपुरुष हे दासगुप्ता यांचे काही उल्लेखनीय चित्रपट होत. दासगुप्ता यांनी अंधी गली व अन्वर का अजब किस्सा या हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले होते. त्यांनी १२ राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते.