मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी जप्त; गाडीत सापडलेल्या चिठ्ठीने खळबळ
देश बातमी

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी जप्त; गाडीत सापडलेल्या चिठ्ठीने खळबळ

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळली आहे. मुंबईतील अँटिलिया या त्यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा मोठा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. याशिवाय गाडीत एक पत्रही सापडल्याची माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावरच ही स्कॉर्पिओ उभी होती. गाडीत स्फोटके असल्याची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी धाव घेत वाहनाची तपासणी सुरु केली. या घटनेनंतर पोलिसांनी अंबानींच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ केली असून जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. कारमायकल रोडवर मोठया प्रमाणावर पोलिसांसह कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या काही अंतरावर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या २० कांड्या सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस करीत असून चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पियो कार आठवडाभरापूर्वी विक्रोळी येथून चोरीला गेली होती. या गाडीच्या चोरीची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. गाडीमध्ये काही बनावट नंबर प्लेट्सही आढळल्या आहे. स्कॉर्पिओ कारमध्ये एकूण चार नंबर प्लेट आढळून आल्या आहेत. यापैकी एक नंबर प्लेट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नावाने रजिस्टर आहे.

त्याचबरोबर पोलिसांना कारमध्ये एक बॅग सापडली आहे. त्यामध्ये एक चिट्ठी देखील सापडली आहे. बॅगवर ‘मुंबई इंडियन्स’ अलं लिहिलं आहे. चिठ्ठीत लिहिलं की, नीता भाभी आणि मुकेश भैया ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या.