गुजरातकडे जाणाऱ्या गाडीत कोट्यवधी रुपये; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन्स
देश बातमी

गुजरातकडे जाणाऱ्या गाडीत कोट्यवधी रुपये; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन्स

नवी दिल्ली : गुजरातला जाणाऱ्या एका कारमध्ये कोट्यवधींच्या नोटा सापडल्या असून त्या मोजण्यासाठी अख्खा दिवस लागला. कारमध्ये सापडलेले पैसे मोजण्यासाठी चक्क बँकेतून मशीन्स मागवाव्या लागल्या. राजस्थानातील डुंगरपूर पोलिसांनी गुजरातकडे जाणारी एक कार जप्त केली. शनिवारी राष्ट्रीय महामार्ग ८वरून ही कार गुजरातकडे जात असतानाच पोलिसांनी कारवाई केली. यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डुंगपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलिसांनी कार रोखली. त्यानंतर झाडाझडती घेतली असता, त्यात मोठी रक्कम आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी कार ताब्यात घेतली. हे कोट्यवधी रुपये दिल्लीहून गुजरातला हवालाच्या मार्गे नेण्यात होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस उपअधीक्षक मनोज सवारिया याबाबत म्हणाले, पैसे जप्त करण्यात आले आहेत आणि आरोपींची चौकशीही केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार हे प्रकरण हवालाशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं आहे. आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे, अशी माहिती सवारिया यांनी दिली. कारची झाडाझडती घेतल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. कारमध्ये मोठ्या प्रमाणात नोटा होत्या. कारमध्ये असलेल्या नोटा मोजण्यासाठी पोलिसांना बँकेमधून मशीन्स मागवाव्या लागल्या. सकाळी सुरू झालेलं नोटा मोजण्याचं काम सायंकाळपर्यंत सुरू होतं. ज्या कारमधून ही रक्कम घेऊन जाण्यात येत होती. त्या गाडीचा क्रमांक डीएल८ सीएएक्स३५७३ असा आहे.